ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशी; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान
By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2025 12:00 IST2025-04-29T11:59:26+5:302025-04-29T12:00:59+5:30
आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची गरज

ओळख लपवूनही राहतात परदेशी, त्यात आहेत सर्वाधिक बांगलादेशी; शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर घालवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. हे सर्व पाकिस्तानी अधिकृतरीत्या भारतात आले होते. याचवेळी ओळख लपवून देशात राहिलेल्या परदेशींनाही हाकलून लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. विशेषत: अनेक बांगलादेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहात आहेत. कोल्हापुरातही असे प्रकार उघडकीस आल्याने त्यांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान यासह काही आफ्रिकन देशांचे नागरिक ओळख लपवून भारतात राहिल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. देशविघातक कृत्यांमधील त्यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. पहलगाम येथील हल्ल्यात थेट काही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येताच सरकारने देशातील सर्व पाकिस्तानींना परत पाठवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार दीर्घकाळ मुदतीचा व्हिसा नसलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले. मात्र, छुप्या मार्गाने येऊन ओळख लपवून भारतात राहिलेले अनेक परदेशी नागरिक आजही देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत. त्यांना शोधून देशाबाहेर घालवण्याचे आव्हान पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.
स्थानिकांची मदत
सहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरात दोन बांगलादेशी महिलांना अटक झाली होती. देहविक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या त्या दोन्ही महिलांना सांगलीतील एका एजंटने आधारकार्ड आणि रेशनकार्ड काढून दिल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती. यावरून परदेशी नागरिकांना मदत करण्यात आणि आश्रय देण्यात स्थानिक रहिवासी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले होते. यांचा वेळीच शोध न घेतल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग
गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यात पोलिसांनी पकडलेल्या दोन बांगलादेशींचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. अवैध धंद्यांमध्येही त्यांच्या सहभागाचे अनेक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे ओळख लपवून राहणारे परदेशी अधिक घातक ठरत आहेत.
अमली तस्करी
अमली पदार्थांची तस्करी करणे आणि बनावट नोटांच्या गुन्ह्यातही काही परदेशी नागरिकांचा सहभाग आढळला आहे. अमली पदार्थांची तस्करी करणारे दोन आफ्रिकन आरोपी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात त्यांचा वावर असल्याचे बोलले जाते.
तपास रखडले?
करवीर पोलिसांकडून बांगलादेशी महिलांचा तपास सुरू होता. त्यांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड कोणी काढून दिले? त्यांना सांगलीत कोणी आणले? आश्रय कोणी दिला? त्यांना कोल्हापुरात घेऊन येणारे कोण आहेत? त्या महिलांना परत बांगलादेशात पाठवण्यासाठी पोलिसांनी काय केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत.