अण्णा हजारेंच्या जनआंदोलनापासून देशात परकीय शक्तींचा हस्तक्षेप, परिमल सुधाकर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:05 IST2025-12-18T12:04:34+5:302025-12-18T12:05:57+5:30
आर्थिक विषमता, बेरोजगारी देशांवरील अस्थिरतेची टांगती तलवार

अण्णा हजारेंच्या जनआंदोलनापासून देशात परकीय शक्तींचा हस्तक्षेप, परिमल सुधाकर यांचे मत
कोल्हापूर : दक्षिण आशियातील नेपाळ, श्रीलंका आणि बांग्लादेशमधील जनआंदोलन उफाळून सत्तांतर झाले हे जरी खरे असले तरी त्यामागे परकीय शक्तींचा हस्तक्षेप होताच. आपल्या देशात पंधरा वर्षापूर्वीच म्हणजे २०११ मध्येच अण्णा हजारे यांच्या जनआंदोलनापासूनच या हस्तक्षेपाची सुरुवात झाली होती. तिन्ही देशांतील जनउद्रेकामागे तेथील आर्थिक विषमता आणि बेरोजगारी हेच कारण होते, आगामी काळातही भारतासह सर्व दक्षिण आशिया देशांवर राजकीय अस्थिरतेची टांगती तलवार कायम असल्याचे प्रतिपादन डॉ. परिमल सुधाकर यांनी केले.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात बुधवारी श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अविनाश पानसरे व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प डॉ. सुधाकर यांनी ‘ दक्षिण आशियातील जनतेचे उठाव आणि सत्तांतर’ या विषयावर गुंफले. ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले अध्यक्षस्थानी होते.
डॉ. परिमल सुधाकर म्हणाले, श्रीलंकेत महागाई आणि सरकारचे धोरण, बांगलादेशात आरक्षण व न्यायालयीन हस्तक्षेप तर नेपाळ मध्ये सोशल मीडियावर घातलेली बंदी यामुळे जन आंदोलन उभे राहिले. या देशांतील ही जरी कारणे असली तरी तेथील प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते यांच्या विरोधात जनमत ताणलेले होते. जनआंदोलनातून सत्तांतर झाले पण, आंदोलनातील प्रमुख घटक असलेला ‘जेन्झी’ ( १९९७ नंतर जन्मलेला तरुण) कडे स्वत:ची वैचारिक बैठक नसल्याने नवनिर्मितीची बांधणी त्यांच्याकडे नव्हती.
श्रीलंकेतील आंदोलनात ‘जेन्झी’सह श्रमिक, शेतकऱ्यांसह विविध संघटना उतरल्याने अहिसंक आंदोलन झाले. त्या उलट नेपाळ आणि बांगलादेशात घडले. या आंदोलनामध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप राहिला. आपल्या देशात यापूर्वीच आण्णा हजारेंच्या आंदोलनातून झाला होता, त्यावेळी ‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही’ केंद्रबिंदू होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. अंशुमन सुळगांवकर यांनी प्रास्ताविक केले. मोहसीन मोमीन यांनी आभार मानले.