कोल्हापूर : पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनीत राहणारा उमेश बबन भगत (वय ३८) याने राहत्या घरात छताच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (दि. २३) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश भगत हा काही वर्षांपूर्वी फुलेवाडी फुटबॉल क्लबकडून खेळत होता. अलीकडे तो एका खासगी कंपनीत काम करीत होता. पत्नी आणि दोन मुलींसह तो योगेश्वरी कॉलनीतील घरात राहत होता. सोमवारी सकाळी त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलींना शाळेत सोडून आल्यानंतर त्याने घरातील छताच्या हुकाला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच शेजारी आणि नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या आत्महत्येची माहिती समजताच मित्र आणि फुटबॉल खेळाडूंनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली होती. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि वडील असा परिवार आहे.
कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूने गळफास घेत संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:36 IST