शहरातील पाच कोविड सेंटर्स झाली सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST2021-04-02T04:24:05+5:302021-04-02T04:24:05+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणास गुरुवारी गती आल्याचे दिसून आले. दिवसभरात शहरात २९४६ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. दरम्यान, कोरोना ...

शहरातील पाच कोविड सेंटर्स झाली सज्ज
कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणास गुरुवारी गती आल्याचे दिसून आले. दिवसभरात शहरात २९४६ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आयसोलेशन रुग्णालयासह शहरातील पाच कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्यात आली आहेत.
कोरोना संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत. त्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभाग लसीकरण आणि उपचाराकरिता सज्ज झाला आहे. शहरात महापालिकेची अकरा नागरी आरोग्य केंद्रे, खासगी अठरा रुग्णालये, सीपीआर रुग्णालय अशा तीस ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. गुरुवारपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून सर्वच केंद्रांवर लस घेण्यासाठी गुरुवारी गर्दी झाली होती.
गुरुवारी एकाच दिवसात सर्वाधिक २९४५ व्यक्तींनी लस घेतली. त्यामुळे शहरातील सर्वच केंद्रांवर नागरिकांची गर्दी झाली होती. तीव्र उन्हापासून बचाव करता यावा म्हणून लसीकरण केंद्रावर पालिकेने मंडप घातले असून तेथे बसण्याची व्यवस्था केली आहे. शहरात आतापर्यंत ११ हजार ६३४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी, तर ६४१० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. सहव्याधी असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील ८७५९ व्यक्तींनी, तर साठ वर्षांवरील ३१ हजार ४७१ व्यक्तींनी लस घेतली.
कोविड केअर केंद्राची सज्जता -
महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयातील सहा आयसीयू बेडसह ७१ बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले असून तेथे सध्या २१ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण वाढीची संभाव्य संख्या लक्षात घेता आयसोलेशन रुग्णालयासह शेंडापार्क प्रशिक्षण केंद्र, अंडी उबवण केंद्र, फुलेवाडी, राजोपाध्येनगर, शिवाजी विद्यापीठातील डॉट, कसबा बावडा येथील कोविड केअर पुन्हा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. या सर्व केंद्रांवर ३७६ बेडची सोय होणार आहे. केंद्राची आवश्यकता पाहून डॉक्टर्स, नर्स यासह अन्य कर्मचाऱ्यांच्या नेमणुका ठोक मानधनावर केल्या जाणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सांगितले.
सुट्टीदिवशीही लसीकरण -
लसीकरणाची व्याप्ती लक्षात घेता सुट्टीच्या दिवशीही शहरात लसीकरण केंद्रे सुरू राहणार आहेत. दि. १ एप्रिल ते दि.३० एप्रिल या काळात ही केंद्रे सलग सुरू राहणार असल्याचा आदेश व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका गुरुवारी डॉ. पोळ यांनी केल्या.