कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील गौराबाई गावडे (वय ६०) यांचा जीबीएस सिंड्रोम आजाराने काल, गुरूवारी संध्याकाळी मृत्यू झाला. येथील सीपीआर रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला असून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहितीही घेतली आहे. गावडे यांना तीन दिवसांपूर्वी सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना जीबीएस सिंड्रोमची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. प्लाजमापेरीसीसचे उपचार चालू होते. परंतू उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सध्या सीपीआरमध्ये आणखी सात रूग्ण दाखल असून त्यांची तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील जीबीएसच्या पहिल्या बळीमुळे मात्र याची चर्चा होताना दिसत आहे. सीपीआरमध्ये दाखल झालेले जीबीएसचे पहिले दोन रूग्ण हे कर्नाटकातील तर तिसरा रूग्ण असलेली मुलगी झारखंडमधील होती. तिसऱ्याच दिवशी या १२ वर्षीय मुलीचे पालक डिस्चार्ज घेवून झारखंडला गेल्याचे सांगण्यात आले.
GBS Outbreak: कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोमचा पहिला बळी
By समीर देशपांडे | Updated: February 14, 2025 13:38 IST