Fire audits of all hospitals in the city | शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट

शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट

ठळक मुद्देराज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेची कार्यवाही अग्निशमनच्या सुविधा नसल्यास होणार कारवाई

कोल्हापूर : शहरातील सरकारीसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. भंडाऱ्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी अग्निशमन विभागाला तशा सूचना केल्या आहेत. अग्निशमनच्या सुविधा नसणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.

भंडारा येथील सरकारी रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सरकारीसह खासगी रुग्णालयांचेही फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सोमवारी अग्निशमन विभागाला शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या आहेत.

३०३ रुग्णालयांची होणार तपासणी

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या रुग्णालयासह शहरातील खासगी ३०३ रुग्णालयांची तपासणी होणार आहे. आपत्कालिन स्थितीसाठी त्यांच्याकडून काय उपाययोजना केल्या आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. आगप्रतिबंधक साधनसामग्रींची मोडतोड झाली असल्यास अथवा कमतरता असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

वास्तविक महापालिकेकडून दरवर्षी अग्निशमन सुविधांसंदर्भातील बी फॉर्म घेतल्याशिवाय परवाना नूतनीकरण केला जात नाही. यामुळे बहुतांशी रुग्णालयांसह इतर व्यावसायिकांचेही फायर ऑडिट केले आहे. असे असले तरी राज्य शासनाच्या सूचनेनुसार शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट नव्याने केले जाणार असून काही त्रुटी असल्यास संबंधितांना नोटीस बजावून कारवाई केली जाईल.
- रणजित चिले,
अग्निशमन दल प्रमुख

Web Title: Fire audits of all hospitals in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.