Kolhapur: वाघनख्यांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त सापडला, मुख्यमंत्र्यांऐवजी उद्या सांस्कृतिकमंत्री करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:29 IST2025-10-27T16:29:24+5:302025-10-27T16:29:46+5:30
प्रदर्शनात २३५ शिवकालीन शस्त्रे

Kolhapur: वाघनख्यांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त सापडला, मुख्यमंत्र्यांऐवजी उद्या सांस्कृतिकमंत्री करणार उद्घाटन
कोल्हापूर : ऐतिहासिक वाघनख्यांच्या प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस येथे भरवण्यात येणाऱ्या ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांऐवजी उद्या (मंगळवार, दि.२८ ऑक्टोबर रोजी) सांस्कृतिकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन आठ महिने कोल्हापुरात सुरू राहणार आहे.
‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ प्रदर्शनासाठी ६ कोटी ७६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून प्रदर्शन दालनासह विविध कामे पूर्ण झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणली आहेत. सातारा येथे दि.२० जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत, तर नागपूर येथे दि.१ फेब्रुवारी दि.३० सप्टेंबरपर्यंत त्याचे प्रदर्शन भरवले होते. आता ही वाघनखं कोल्हापुरात आली असून, त्याचे प्रदर्शन यापुढे ८ महिने राहणार आहे.
सकाळी १०:४५ वाजता होणाऱ्या या सोहळ्याला खासदार शाहू छत्रपती, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संभाजीराजे छत्रपती, प्रतापगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे शाही सदस्यही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, सतेज पाटील, जयंत आसगावकर, अरुण लाड, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, शिवाजीराव पाटील, राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे उपस्थित राहणार आहेत.
प्रदर्शनात २३५ शिवकालीन शस्त्रे
या प्रदर्शनात शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांच्याकडून राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या शिवकालीन शस्त्रांपैकी तलवारी, धोप, बुरूज, पट्टा, कट्यारी, ढाल, धनुष्यबाण, खंजीर, कुऱ्हाडी, बंदुकी, अशी २३५ शस्त्रेही पाहायला मिळणार आहेत. लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी शाहूंचा हत्तीचा रथ व घोड्यांची बग्गी सज्ज आहे. ‘सी’ इमारतीत प्रवेश-वाघनखं आणि शस्त्रांची पाहणी, राजर्षी शाहू जन्मस्थळ, जन्मस्थळातील संग्रहालय, ‘डी’ इमारतीतील संग्रहालय, तसेच राजर्षी शाहूंवरील माहितीपट, होलिग्राफी शो, असे या प्रदर्शनाचे स्वरूप असेल.