Filmfare nomination for Kolhapur native | कोल्हापूरच्या देशी लघुपटाला फिल्मफेअरचे नामांकन
कोल्हापूरच्या देशी लघुपटाला फिल्मफेअरचे नामांकन

ठळक मुद्देकोल्हापूरच्या देशी लघुपटाला फिल्मफेअरचे नामांकनस्थानिक कलावंतांचा समावेश : सांगली फेस्टिव्हलमध्ये सात पारितोषिके

कोल्हापूर : कोल्हापूरातील स्थानिक कलावंतासोबत नामांकित अभिनेत्री असलेल्या देशी या लघुपटाला फिल्मफेअरच्या लघुपट स्पर्धेत नामांकन मिळालेले आहे. या लघुपटाने पदार्पणातच सांगलीच्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात सात पारितोषिके मिळविली आहेत.

चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ प्रस्तुत या लघुपटाची निर्मिती राजेंद्रकुमार मोरे यांनी केली आहे. या लघुपटात वीणा जामकर यांनी नायिकेची भूमिका केली असून इतर सर्व कलाकार तसेच तंत्रज्ञ हे स्थानिक आहेत.

देशी लघुपटातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाºया अडचणींचा विषय मांडण्यात आला आहे. या लघुपटाची कथा मनाला स्पर्शून जाणारी असून प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा सामाजिक संदेश यातून दिला आहे.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज एंटर्टेनमेंट, रिटच प्रॉडक्शन प्रस्तुत, आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवामध्ये उत्कृष्ट लघुपट : देशी (प्रथम), उत्कृष्ट दिग्दर्शक : रोहित बापू कांबळे (प्रथम), उत्कृष्ट अभिनेत्री : वीणा जामकर (प्रथम), उत्कृष्ट बाल कलाकार : गार्गी नाईक (द्वितीय), उत्कृष्ट छायांकन: जयदिप निगवेकर (प्रथम), उत्कृष्ट संगीतकार : डॉ. जयभिम शिंदे (प्रथम)आणि उत्कृष्ट संकलन: शेखर गुरव (तृतीय) अशीे तब्बल सात पारितोषिके या लघुपटाने पटकाविली.

फिल्मफेअरच्या शॉर्ट फिल्म अ‍ॅवार्डस २0२0 च्या स्पर्धेत सामाजिक जागृती या गटात देशी लघुपटाची निवड झाली असून सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट फिक्शन चित्रपट, सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन चित्रपट आणि प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी या लघुपटाला नामांकन मिळालेले आहे. प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी देशी लघुपटाला आॅनलाईन मतदान करण्याचे आवाहन दिग्दर्शक रोहित बापू कांबळे यांनी केले आहे.

या लघुपटाचा प्रीमिअर कोल्हापूरात गेल्या आठवड्यात अभिनेत्री वीणा जामकर यांच्या उपस्थितीत झाला होता.
 

 

Web Title: Filmfare nomination for Kolhapur native

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.