मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल कराजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:14+5:302021-01-08T05:16:14+5:30
कोल्हापूर : शहरांत फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून त्यांच्या मालकांवर कडक कारवाई करावी. महानगरपालिकेने रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून पांजरपोळ, ...

मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल कराजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा
कोल्हापूर : शहरांत फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून त्यांच्या मालकांवर कडक कारवाई करावी. महानगरपालिकेने रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून पांजरपोळ, कोंडवाड्यात सोडावे. या मोकाट फिरणाऱ्या जनावरांची मालकी सांगणाऱ्या व्यक्तीवर प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी येथे दिल्या.
जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, साखर कारखान्यावर ओढकाम करणाऱ्या बैलांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्रांची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी बंधनकारक आहे. श्वान प्रजनन व विपणन नोंदणीची वैधता दोन वर्षे व पाळीव प्राण्यांची दुकाने नोंदणीची वैधता ५ वर्षे आहे. विनानोंदणी व्यवसाय आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करा.
दोन वर्षांपर्यंत पैदास नको..
पैदाशीसाठी पाळलेल्या मादी पिलाची २ वर्षे वयापर्यंत पैदास घेण्यात येऊ नये व श्वानाची नोंद ८ वर्षे वयापर्यंत ठेवणे आवश्यक आहे. पैदाशीनंतर नवीन जन्मलेल्या श्वान पिलाला वेळच्यावेळी लसीकरण करून हेल्थ रेकॉर्ड ठेवावे. जन्मलेल्या श्वान पिलांची ८ आठवड्यांच्या आत व ६ महिन्यांनंतर विक्री करता येणार नाही. नियमांच्या अंमलबजावणीसाठी निरीक्षक नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. अनोंदणीकृत पेट शॉप किंवा श्वान प्रजनन केंद्र आढळल्यास नोटीस दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत नोंदणी बंधनकारक राहील. अन्यथा सील केले जाईल.
पिंजऱ्यात कुत्री ठेवता येणार नाहीत..
पेट शॉपमध्ये विक्रीकरिता जाळीदार पिंजऱ्यामध्ये कुत्री ठेवता येणार नाहीत. मांजरे, पक्षी, लव्ह बर्डस, मूषक, ससे इत्यादींची विक्री पिंजऱ्यामधून करता येईल. दुकानासमोरील मोकळ्या जागेमध्ये प्राणी-पक्ष्यांचे प्रदर्शन करता येणार नाही.
नोंदणी बंधनकारक...
पाळीव प्राणी दुकान नोंदणी करण्यासाठी अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कोल्हापूर यांच्याकडे सादर करावा. अर्जाचा नमुना कार्यालयाकडे तसेच Kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.