अंधेरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची दाखविली भिती, आजऱ्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेची २९ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 19:23 IST2025-01-27T19:22:14+5:302025-01-27T19:23:18+5:30
अनोळखी फोन उचलला आणि घोटाळा झाला

अंधेरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची दाखविली भिती, आजऱ्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेची २९ लाखांची फसवणूक
सदाशिव मोरे
आजरा : अंधेरी ( मुंबई ) पोलीस ठाण्यात आपले विरुद्ध गुन्हा दाखल आहे असे सांगून वेळोवेळी कारवाईची भिती दाखवत आजरा येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका यांची २९ लाख ९३ हजार १५० रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशी फिर्याद सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना चंद्रशेखर मंगळूरकर ( मीरालय शिव कॉलनी आजरा ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
अनोळखी इसमाने आपल्याकडील विविध मोबाईल नंबर वरून अंधेरी पोलीस ठाणेत आपले विरुध्द गुन्हा दाखल आहे.यासह अन्य खोटी माहिती मोबाईलवरुन देऊन प्राध्यापिका मीना मंगळूरकर यांची २८ डिसेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत आर्थिक फसवणूक केली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसात अनोळखी इसमाकडून मीना मंगरूळकर यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यानंतर अंधेरी पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला अटक होणार आहे, याबाबतची माहिती कोणालाही सांगायची नाही, पैसे न दिल्यास आपल्याला अटक होईल व बदनामी होईल अशी वारंवार भिती दाखविली व पैशाची मागणी केली.
भितीने मीना मंगळूरकर यांनी संबंधित इसमाच्या बँक खात्यावर आरटीजीएस, गुगल पे च्या माध्यमातून २९ लाख ९३ हजारांची रक्कम हस्तांतरीत केली आहे. या दरम्यान त्यांचा मोबाईलही हॅक केल्याचे सांगण्यात आले. आपल्या खात्यावरील पैसे संपल्यानंतरही पैशाची मागणी होऊ लागल्याने त्यांनी आजरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगडचे पोलीस निरीक्षक लोंढे करीत आहेत.
अनोळखी फोन उचलला आणि घोटाळा झाला
मीना मंगळूरकर यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. तो त्यांनी उचलताच त्यांचा विश्वास संपादन करीत गुन्ह्याची माहिती दिली व वारंवार भिती दाखवून पैसे उकळले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाची अनोळखी फोन उचलला व घोटाळा झाला अशी विचीत्र अवस्था झाली आहे.
अनोळखी फोन व ऑनलाइन व्यवहारापासून सावधान
मोबाईलवरील अनोळखी फोन शक्यतो उचलू नका. ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता बाळगा. ऑनलाइन व्यवहारातून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले आहे.