दुर्देवी घटना! आजऱ्यात मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:19 IST2022-01-27T16:19:30+5:302022-01-27T16:19:48+5:30
सकाळपासूनच लग्नाची धांदल सुरु असतानाच माणगावकर कुटुंबावर काळाने घाला घातला.

दुर्देवी घटना! आजऱ्यात मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू
आजरा : मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आजऱ्यात घडली. प्रा. हसनसाब अब्दुल माणगावकर असे या मृत वडिलांचे नाव आहे. माणगावकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हसनसाब माणगावकर हे आजरा महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक होते.
सकाळपासूनच लग्नकार्याची धावपळ सुरु असतानाच ही घटना घडल्याने उपस्थित नातेवाईकांना धक्काच बसला. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराला त्यांच्यावर अंत्यसंस्काराची करण्याची दुर्देवी वेळ आली.
प्रा. हसनसाब माणगावकर यांच्या अल्फिया या मुलगीचा आज विवाह होता. सकाळपासूनच सर्वांची धावपळ सुरू होती. त्यातच सरांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी आजरा व गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी व कुटुंबीयांवर एकच शोककळा पसरली.
एक निगर्वी व कायम हसतमुख चेहरा असणाऱ्या सरांच्या निधनामुळे सर्व धर्मीयांमध्ये शोककळा पसरली. हिंदू-मुस्लीम समाजाला एकत्र करून दोन्ही समाजात एकोपा घडवून आणणारे प्रा. हसनसाब समाज प्रिय शिक्षक होते. सुंदर हस्ताक्षर व उत्कृष्ट फलक लेखनामुळे ते विद्यार्थी प्रिय होते.
इंग्रजी विषयात एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या लाडक्या अल्फियाचे थाटात लग्न करण्याचा सरांचा मनोदय होता. पण लग्नापूर्वीच सरांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे व दोन मुली भाऊ असा परिवार आहे.
.. सर बाबा को बुलाव..
प्रा. हसन माणगावकर यांचा पार्थिव आजऱ्यातील घरी आणल्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी अंत्यदर्शन घेण्यासाठी घरी गेले. सर्वांना पाहून लाडकी अल्फिया हिने एकच हंबरडा फोडला व " सर बाबा को बुलाव " अशी आर्त हाक दिली. त्यावेळी सर्वांनाच हुंदका आवरता आला नाही.