यड्राव : माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली होती. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी किसानही पुढे सरसावला आहे. साखर कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या टनामागील एक रुपया जवानांसाठी देण्याचे आवाहन नांदणी ता. शिरोळ येथील शेतकऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून उत्स्फुर्त निधी जमा होत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नांदणी येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. प्रारंभी पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
नांदणीच्या शेतकऱ्यांचा हा आदर्श उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचविण्यात येणार आहे. ज्या-त्या भागात निधी संकलन करून त्या-त्या भागातील संकटग्रस्तांना मदत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हा निधी शेतकऱ्यांच्याच प्रतिनिधीकडे संकलित करण्यात येणार असल्याने तो संकटग्रस्तापर्यंत निश्चिंतपणे पोहचू शकेल, याबाबत कोणासही शंका राहणार नाही, अशी चर्चा या बैठकीत झाली.देशाचे रक्षणकर्ता व देशासाठी अन्नधान्य निर्माण करणारे दोन्ही देशसेवक उपेक्षित आहेत.परंतु शेतकऱ्यांनी जवानांसह आपल्या बांधवासाठी घेतलेला हा उपक्रम मोठा आहे. सर्वसामान्यांना एखाद्या मोठ्या संकटप्रसंगी मदत करण्याची इच्छा असते, परंतु ती कोठे करावी याची माहिती त्यांना नसते. त्यामुळे या उपक्रमामार्फत सर्वजण उस्फुर्तपणे मदत करत देशबांधवांसाठी पुढे सरसावले आहेत.
नांदणी येथील शेतकरी बांधवांनी देशप्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे, संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम लवकरच देशभर पोहचेल अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सागर संभूशेटे यांनी व्यक्त केली.