राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:29 IST2021-08-19T04:29:32+5:302021-08-19T04:29:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्ताने आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या ...

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या शेतकरी मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्ताने आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या पुढाकारातून शुक्रवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी ११ वाजता दसरा चौकातील यशवंतराव चव्हाण सभागृहात शेतकरी मेळावा होणार आहे. शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. दोन मंत्री व आमदार पाटील एकत्र येत असल्याने राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेली अठ्ठावीस वर्षे आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने सद्भावना दौड व शेतकरी मेळाव्याचे आयोजन होत आहे; परंतु यंदा कोरोनामुळे दौड रद्द करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन होत असते. आतापर्यंत राष्ट्रीय, तसेच राज्यस्तरावरील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या दौडीसाठी आपली उपस्थिती लावली आहे. यंदाच्या जयंती उत्सवास जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती रसिका अमर पाटील यांचा सत्कार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होत आहे.
या समारंभास कोल्हापूर शहर, तसेच करवीर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार पी. एन. पाटील यांनी केले आहे.