यवलूज : शेतात पाॅवर टिलरच्या साह्याने मशागत करत असताना झाडाच्या व पॉवर टिलरच्या मध्ये अडकून यवलूज (ता. पन्हाळा) येथील सागर आनंदा पाटील (वय ४३) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.अधिक माहिती अशी की, मृत सागर गावातील वड्यावरील शेतामध्ये पॉवर टिलरच्या साह्याने मशागत करत होता. पॉवर टिलर मागे घेत असताना पाठीमागील झाडाचा अंदाज न आल्याने टिलर एकदम मागे आल्यामुळे टिलर व झाडामध्ये अडकलेल्या सागर यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली.
ही घटना काही वेळाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना दिसून आली. त्यांनी तात्काळ जखमी अवस्थेत त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी, असा परिवार आहे.