Farmer suicides by financial fraud in Kadaknath scam | कडकनाथ घोटाळ्यातील आर्थिक फसवणुकीतून शेतकऱ्याची आत्महत्या

कडकनाथ घोटाळ्यातील आर्थिक फसवणुकीतून शेतकऱ्याची आत्महत्या

ठळक मुद्देकडकनाथ घोटाळ्यातील आर्थिक फसवणुकीतून शेतकऱ्याची आत्महत्यानैराश्यातून केले विष प्राशन : शेतकरी मसुदमालेचा : राज्यभर खळबळ

कोल्हापूर : राज्यात गाजत असलेल्या इस्लामपूरच्या रयत अ‍ॅग्रोच्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात आर्थिक फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून विष प्राशन केलेल्या तरुणाचा ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. प्रमोद सर्जेराव जमदाडे (२५, रा. मसुदमाले, ता. पन्हाळा) असे मृताचे नाव आहे. कडकनाथ फसवणूक प्रकरणात जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.

प्रमोद जमदाडे याने गावात किराणा बझार सुरू केला होता. त्यानंतर वर्षभरापूर्वी ‘कडकनाथ’ कोंबडी पालन व्यवसायासाठी अडीच लाख रुपये भरले होते; त्यासाठी गावात शेड उभारून अन्य सोईसुविधा उभारल्या होत्या; मात्र घोटाळ्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले होते. कर्ज काढून व्यवसाय करण्याचे स्वप्न भंग पावले होते.

या नैराश्यातून त्याने १८ जानेवारीला विष प्राशन केले होते. नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले असता, मंगळवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कडकनाथ घोटाळ्यातील जमदाडे हा पहिला बळी ठरला.

या घटनेमुळे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्याविरोधात कोल्हापूरसह इस्लामपूर, सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा तपास सुरू असला, तरी फसवणूक झालेल्या शेतकºयांना आर्थिक नुकसान अद्याप मिळालेले नाही. जमदाडे याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सीपीआर पोलीस चौकी व कोडोली पोलीस ठाण्यात विष प्राशनाने मृत्यू अशी नोंद झाली आहे.

तालुक्यात संघटन

प्रमोद जमदाडे याने पन्हाळा तालुक्यातील फसवणूक शेतकऱ्यांची मोट बांधून मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. तो वारंवार या प्रकरणाचा पाठपुरावा करीत होता. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्याची शेवटपर्यंत धडपड सुरू होती. त्याचा विष प्राशनाने मृत्यू झाल्याचे समजताच गावात नातेवाईक, मित्र व फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी गर्दी केली.

सागर खोतवर गुन्हा दाखल करा

कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याच्या नैराश्यातून शेतकरी प्रमोद जमदाडे याच्या आत्महत्येस माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा जबाबदार आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कडकनाथ संघर्ष समितीचे विजय आमते यांनी पत्रकारांसमोर केली. यासंदर्भातील निवेदन पालकमंत्री सतेज पाटील यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री खोत यांनी भूमिका स्पष्ट करावी

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूरच्या रयत अ‍ॅग्रोच्या कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाशी आपला काय संबंध आहे, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जमदाडे कुटुंबीयाला न्याय द्यावा, अशी भावनिक प्रतिक्रिया मृत प्रमोदच्या आई-वडिलांनी केली आहे.

घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास

‘कडकनाथ’ कोंबडी पालन व्यवसायप्रकरणी इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो लि. कंपनीच्या संचालकांविरोधात शेतकऱ्यांची सुमारे तीन कोटी ९४ लाख ५९ हजार ९३० रुपयांची फसवणूक केल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) व इतर संचालकांवर गुन्हा दाखल आहे.

संशयित मोहिते याने कोल्हापुरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्यालय सुरू केले होते. येथून त्याने संपूर्ण जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्यांवर संपर्क साधून कोंबडीपालन व्यवसायाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
 

 

Web Title: Farmer suicides by financial fraud in Kadaknath scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.