वळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 14:10 IST2019-06-13T14:09:01+5:302019-06-13T14:10:42+5:30
अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे.

वळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावला
कोल्हापूर: अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे. पावसाअभावी भेगाळलेल्या जमिनींचीही तहान भागली आहे. पुरेसा ओलावा झाल्याने मशागत करुन ठेवलेल्या शिवारांमध्ये पेरणीची लगबगही सुरु झाली आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या पिकांसाठी हा पाउस संजीवनी देणारा ठरला आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आगमन झालेल्या पावसात न्हाउन निघण्याचा आनंद अख्खी सृष्टी अनुभवत आहे.
मान्सूनचे आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर पडले असलेतरी अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण, मुंबई, मध्यमहाराष्ट्रासह दक्षिण महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार, मंगळवारी रात्री तासभर पावसाने चांगली हजेरी लावली.
आभाळ भरुन येत होते, पण जोराचा पाउस पडत नव्हता. बुधवारी सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने प्रतिक्षा संपल्याचे वाटप असतानाच दुपारी परत उन पडले, पण अधेमधे एखादी येणारी सर दिलासा देउन जात होती. संध्याकाळी साडेपाचनंतर मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास दीडतासाहून अधिक काळ पाउस पडला.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४५.६२ मिलीमीटर पाउस नोंदवण्यात आला. यात सर्वाधिक ३८ मिलीमीटर पाउस गगनबावड्यात झाला. चंदगडमध्ये २४.३३ तर आजºयात १३ आणि करवीरमध्ये १२. २७ मिलीमीटर तर भूदरगडमध्ये ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कागल, हातकणंगले, शिरोळमध्ये सर्वात कमी म्हणजे ३ ते ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
उर्वरीत तालुक्यात चांगला पाउस झाल्याने शेतकऱ्यांची पिकांची चिंता मिटली आहे. पेरणीयोग्य पाउस असल्याने आणि चार दिवसात मान्सूनचे आगमन होणार असल्याने पेरणी आटोपून घेण्याच्या नियोजनात शेतकरी आहे. भात, सोयाबीन, भूईमुगाच्या पेरण्या आता वेग घेणार आहेत. राने तयार असल्याने आता केवळ टोकण करण्याचे काम शिल्लक राहिले आहे.