बनावट "कजाप" प्रकरणांची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:13+5:302020-12-05T04:59:13+5:30
* ''लोकमत'' इफेक्ट गडहिंग्लज : गडहिंग्लज भूमिअभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे गेलेल्या ''बनावट कजाप'' प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात ...

बनावट "कजाप" प्रकरणांची चौकशी सुरू
* ''लोकमत'' इफेक्ट
गडहिंग्लज : गडहिंग्लज भूमिअभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे गेलेल्या ''बनावट कजाप'' प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात संबंधित खात्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत तसेच ''त्या'' जमिनीच्या खातेदारांनाही म्हणणे मांडण्यासाठी मंगळवारी (८) सकाळी येथील भूमिअभिलेख कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. भूमिअभिलेख उपअधीक्षकांच्या बनावट सही व शिक्क्यांसह येथील तहसील कार्यालयाकडे दाखल झालेल्या बनावट ''कजाप'' प्रकरण : भूमिअभिलेखची बनावटगिरी'' वृत्तमालिकेद्वारे ''लोकमत''ने उजेडात आणला. तहसीलदार दिनेश पारगे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भूमिअभिलेख उपअधीक्षक सिद्धेश्वर घुले यांनी रितसर चौकशी सुरू केली आहे.
नेसरी-कोवाड मार्गावरील तारेवाडी गावच्या हद्दीतील गटनंबर १०१ मधील १ हेक्टर ४४ गुंठे आणि गडहिंग्लज शहरातील सर्व्हेनंबर ४५/२ पैकी ०.९७ गुंठे या बिगरशेती जमिनींच्या ‘कजाप’ची नोंद ७/१२ पत्रकी करण्यासाठी भूमिअभिलेखकडून तहसील कार्यालयाकडे अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या खातेदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच ''त्या'' बिगरशेती जमिनीच्या गुंठेवारी/अभिन्यास (ले-आऊट) मंजुरीसंदर्भात तहसीलदार, प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा अभिप्रायदेखील मागविण्यात आला आहे. ‘त्या’ जमिनींच्या बिगरशेती मंजुरीपासून जमिनीची मोजणी व ‘कजाप’ तयार करून महसूल विभागाकडे पाठविण्यापर्यंतच्या कालावधीतील भूमीअभिलेख कार्यालयातील अभिलेखपाल, आवक-जावक बारनिशी विभाग लिपीक यांच्यासह आजी-माजी कर्मचारी यांचे लेखी जाब-जबाब नोंदविण्याचे कामदेखील सुरू आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
------------------------------------
* भूखंडधारकही धास्तावले..!
गडहिंग्लज व नेसरी येथील ‘त्या’ बिगरशेती जमिनीत भूखंड खरेदी केलेले नागरिक गोंधळून गेले आहेत. कष्टाच्या पैशांतून घेतलेल्या भूखंडाचे काय होणार? या धास्तीने चौकशीसाठी त्यांचे हेलपाटे सुरू झाले आहेत. -------------------------------------
फोटो : ०४१२२०२०-गड-०५