अंधश्रद्धेला कायद्याचा उतारा
By Admin | Updated: May 31, 2014 01:10 IST2014-05-31T01:06:00+5:302014-05-31T01:10:41+5:30
जादूटोणाविरोधात ६३ गुन्हे : महिलांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ

अंधश्रद्धेला कायद्याचा उतारा
प्रवीण देसाई -कोल्हापूर जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होण्यासाठी जिवाचे रान करणारे; प्रसंगी आपल्या जिवाचे बलिदान देणार्या महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पश्चात हा कायदा झाला. त्यानंतर आतापर्यंत या कायद्यांतर्गत राज्यात ६३ गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये अंधश्रध्देच्या नावाखाली होणार्या महिलांच्या फसवणुकीचे गुन्हे निम्म्याहून अधिक आहेत. हा कायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘अंनिस’ची धडपड सुरू आहे. २० आॅगस्ट २०१३ हा ‘काळा दिवस’ ठरला. पुण्यात ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. यानंतर २२ आॅगस्टला राज्य सरकारने या कायद्याचा वटहुकुम काढला. २६ आॅगस्टपासून तो जारी झाला. २० डिसेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनात हा कायदा मंजूर झाला. तोपर्यंत ३२ गुन्हे दाखल झाले होते. कायदा मंजूर झाल्यानंतर आतापर्यंत त्यात ३१ गुन्ह्यांची भर पडली. एकूण ६३ गुन्हे नोंद झाले आहेत. यातील पहिला गुन्हा नांदेडमधील भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाला. एका मांंत्रिक बाबाच्या विरोधातील हा गुन्हा नोंद झाला आहे. संपूर्ण जगाला ‘पथदर्शक’ असणारा जादूटोणा व अंधश्रध्देविरोधातील हा कायदा राज्यातीलच नव्हे, तर जगातील पहिलाच कायदा आहे. अघोरी, अमानुष व अनिष्ठ अशा प्रकाराविरोधात थेटपणे कारवाई करण्याची क्षमता असलेला हा कायदा आहे. या कायद्यात १२ कलमे असून ती अगदी सुस्पष्ट आहेत. यापूर्वी अनेक कायदे सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झाले आहेत. हे कायदे मंजूर होण्यासाठी त्यासाठी सामाजिक संस्था व संघटनांनी १०० टक्के पाठपुरावा केला आहे. परंतु या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी या संस्थांकडून १० टक्केही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे या कायद्यांचा हेतू व उपयोगिता साध्य झालेली नाही. त्याचबरोबर प्रशासन व राज्यकर्ते यांचेही धोरण याबाबत उदासीन आहे. जादूटोणा विरोधातील या कायद्याचा हेतू चांगला आहे. परंतु इतर कायद्यांसारखी अवस्था या कायद्याची होऊ नये. यासाठी ‘अंनिस’ने राज्यव्यापी जनसंवाद यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधून या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत समाजमन तयार करण्याचे काम सुरू आहे. या यात्रेला ९ मार्चला महाडच्या चवदार तळे येथून सुरुवात झाली. राज्यातील ३५ जिल्ह्यांमधून फिरून ही यात्रा गुरुवारी कोल्हापुरात आली. या ठिकाणीच समारोप होत आहे. यात्रेतील सजविलेल्या वाहनावर कायद्याविषयी प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले होते. ८५ दिवसांच्या काळात कार्यकर्त्यांनी ३००हून अधिक प्रबोधनपर कार्यक्रम घेतले. यामध्ये या कायद्याबाबत नागरिकांचे गैरसमज दूर करणे, पोस्टर प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन व चमत्कार सादरीकरण झाले. या वाहनात ४ प्रशिक्षित कार्यकर्ते होते. ते या कायद्याबद्दल दृक्श्राव्य माध्यमातून सादरीकरण करत प्रबोधन करण्यात आले.