कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत न्या, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:03 IST2025-08-07T12:02:45+5:302025-08-07T12:03:33+5:30
आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी दिल्लीत झाली बैठक

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत न्या, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांची सूचना
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्याची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत न्या, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिली.
कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महासंचालक सूरज मल, सदस्य एम. सुरेश, कार्यकारी संचालक सुजय डे, ए. एस. महेशा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे कोल्हापुरातून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित व सोयीस्कर वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.
कोल्हापुरातून दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करता येईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा अधिक विकसित कराव्यात, विमानतळावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. त्याला विमानतळ प्राधिकरणाने अनुकूलता दर्शवून, लवकरच त्याबद्दलची चाचणी घेतली जाईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूर विमानतळाला श्रेणी पाचमधून, श्रेणी सहामध्ये वर्ग करावे, ज्यामुळे मोठया क्षमतेची विमाने कोल्हापुरात येऊ शकतील. तसेच, जगाच्या नकाशावर कोल्हापूर विमानतळाचे नाव येण्यासाठी अत्याधुनिक सामग्री आणि पायाभूत सुविधा विमानतळावर उपलब्ध व्हावी, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
धावपट्टी २३०० मीटर होणे आवश्यक
सध्या कोल्हापूर विमानतळावर १९३० मीटरची धावपट्टी आहे. पहिल्या टप्प्यात ही धावपट्टी २३०० मीटर होणे गरजेचे आहे. पण, त्यासाठी विमानतळ परिसरातील एका रस्त्याला पर्यायी रस्ता देवून, आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.