व्हॅलेंटाईन डे ला गुलाब फुलांची निर्यात निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:46+5:302021-02-05T07:06:46+5:30
संदीप बावचे जयसिंगपूर : देश-परदेशातील प्रेमवीरांना भुरळ घालणाऱ्या गुलाब फुलावर यंदा मर्यादा आली आहे. परदेशातील लॉकडाऊन, निर्यातीसाठी झालेली तिप्पट ...

व्हॅलेंटाईन डे ला गुलाब फुलांची निर्यात निम्म्यावर
संदीप बावचे
जयसिंगपूर : देश-परदेशातील प्रेमवीरांना भुरळ घालणाऱ्या गुलाब फुलावर यंदा मर्यादा आली आहे. परदेशातील लॉकडाऊन, निर्यातीसाठी झालेली तिप्पट भाडेवाढ, दराची तफावत, शिवाय गुलाब फुलांचे उत्पादन घटल्यामुळे पन्नास टक्केच गुलाब फुलांची निर्यात होणार आहे. त्यामुळे फूल उत्पादकांनी यंदा स्थानिक बाजारपेठेवरच भर दिला आहे.
युरोपियन राष्ट्रांसह भारतामध्येही व्हॅलेंटाईन डे युवक व युवती मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी लाल गुलाब फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. पॉलिहाऊच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते. गुलाब फुले निर्यात करण्यासाठी जानेवारीपासून तयारी केली जाते. निर्यातीमुळे परदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळते. व्हॅलेंटाईन डे साठी परदेशातील हॉलंड, लंडन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या ठिकाणची बाजारपेठ उपलब्ध असते. कोंडीग्रे येथील श्रीवर्धन बायोटेक व जांभळी येथील स्टार ग्रीन हाऊसच्या माध्यमातून फुलांची निर्यात होते.
मात्र, गतवर्षी मार्चनंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे गुलाब फूल उत्पादक मोठ्या अडचणीत आला आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय, परदेशात १५ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे व्हलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर गुलाब फुले पाठविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच निर्यातीसाठी विमानाची तिप्पट भाडेवाढ झाली आहे. काढणी व पाठवणी याचा खर्च परवडत नाही. शिवाय, दराची तफावत, यामुळे लाल गुलाब फुलांची निर्यात मोठ्या प्रमाणात घटणार आहे. दरम्यान, गतवर्षी वातावरणातील बदलांमुळे निर्यातीवर परिणाम झाला होता. यंदा लॉकडाऊनमुळे आणखी घट झाली आहे.
---------------------
लॉकडाऊनचा परिणाम
जानेवारी ते व्हॅलेंटाईन डे च्या दरम्यान फुलांना बऱ्यापैकी चांगला भाव मिळतो. गतवर्षी लॉकडाऊनमुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. १७ मार्चनंतर सर्व विमानसेवा व रस्ते वाहतूक बंद झाल्याने गुलाबाची विक्री ठप्प झाली होती.
............
कोट -
यु. के.मध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन आहे. निर्यातीसाठी विमान भाड्यातही वाढ झाल्यामुळे खर्च परवडत नाही. त्यामुळे यंदा व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठेवर भर दिला असला तरी, परदेशात ५० टक्केच फुले निर्यात होणार आहेत.
- रमेश पाटील, श्रीवर्धन बायोटेक, कोंडीग्रे
फोटो - ०२०२२०२१-जेएवाय-०१-गुलाब फुले