इचलकरंजीत घरगुती गॅस गळतीमुळे स्फोट, वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:22 IST2025-10-30T15:22:21+5:302025-10-30T15:22:54+5:30
Kolhapur News: सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथील घरामधील गिझरला जोडलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने स्फोट झाला. या घटनेत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इचलकरंजीत घरगुती गॅस गळतीमुळे स्फोट, वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी
इचलकरंजी - सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथील घरामधील गिझरला जोडलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने स्फोट झाला. या घटनेत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटाने संपूर्ण घराला भेगा पडल्या असून आजूबाजूच्या व समोरील घरांच्या काचा आणि टाईल्स देखील निखळून पडल्या. घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अण्णासाहेब अंदरघिस्के आणि त्यांच्या पत्नी मनीषा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दरम्यान, याच घरात वरील मजल्यावर झोपलेला त्यांचा मुलगा आणि त्याचे कुटुंब सुखरूप आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी वृंदावन कॉलनी येथे अंदरघिस्के कुटुंबीय राहण्यास आहे ,घरातील खालच्या मजल्यावर आण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी मनीषा राहतात तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा निशांत आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतात, पहाटे 4:45 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे झालेल्या या भीषण घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण परिसर हदरून गेला कोणाला काहीच कळाले नाही, घटनेमध्ये अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी जखमी झाली त्यांना सुरुवातीला येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेले. तेथून प्राथमिक उपचार करून दोघांनाही सांगली सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाणे, महसूल विभागाचे तलाठी, पुरवठा विभागाचे अधिकारी, आणि संबंधित गॅस कंपनीचे प्रतिनिधी यांनी येऊन प्रत्यक्ष जागेवर पाहणी करत पंचनामा केला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरा पाठीमागे असलेल्या पत्राचा शेड त्याचे पत्रे भिंती पूर्ण ढासळल्या घराशेजारी रिकाम्या जागेवर असणारी पत्रे पडले तर संपूर्ण घराला भेगा पडल्या आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने दिवसभर नुकसान ग्रस्त साहित्य हलवण्याचे काम सुरू होते.