एकाच दिवसात चेक क्लिअरचा नियम लागू, पण सहकारी बँकांत सुविधा कधी ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:13 IST2025-11-03T12:11:29+5:302025-11-03T12:13:06+5:30
रिझर्व्ह बँकेचा नियम होऊन महिना उलटला : सहकारी बँकांचे काम गतिमान कसे होणार ?

संग्रहित छाया
कोल्हापूर : बॅंकींग सेवा गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीनच चेक क्लिअरन्स नियम लागू केले आहेत. पण, त्याची अंमलबजावणी अद्यापही काही सहकारी बँकांत सुरू नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीला महिना उलटत आला, तरी अद्याप ज्या गतीने येथे ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते, ते दिसत नाही. मग, सहकारी बॅंकांचे काम गतिमान कसे होणार? अशी विचारणा ग्राहकांमधून होत आहे.
आतापर्यंत धनादेश वटायला दोन ते तीन दिवस लागत होते. धनादेश वटवण्याची आतापर्यंतची प्रक्रिया बॅच-आधारित होती. आता ही प्रणाली सतत चालणाऱ्या क्लिअरिंग व रिअल-टाइम सेटलमेंटमध्ये रूपांतरित केली जाणार आहे. या बदलामुळे धनादेशाचे पैसे नेहमीप्रमाणे दोन-तीन कामकाजाच्या दिवसांत न येता काही तासांतच तुमच्या बँक खात्यात जमा होऊ शकतील. रिझर्व्ह बँकेने ४ ऑक्टोबरपासून नियम सुरू केला आहे.
पण, अद्यापही बहुतांशी सहकारी बँकांच्या ग्राहकांना त्याचा लाभ होताना दिसत नाही. चेक स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसकडे पाठवल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत क्लिअरन्स किंवा रिजेक्शनची पुष्टी होणे अपेक्षित आहे. पण, लवकर कन्फरमेशन होत नसल्याने बॅंकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विहीत वेळेत चेक जमा होणे गरजेचे
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत जमा झालेले चेक क्लिअरिंग प्रक्रियेसाठी स्वीकारले जातील. चेक स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसकडे पाठवले जातात आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत क्लिअरन्स किंवा रिजेक्शनची पुष्टी होते.
तासात होणार खात्यावर पैसे वर्ग
सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जमा केलेले चेक ताबडतोब स्कॅन करून क्लिअरिंग हाऊसकडे पाठवले जातील. सकाळी ११ वाजल्यापासून बँका पटापट पैशांची सेटलमेंट करतील. एकदा सेटलमेंट पूर्ण झाल्यावर, सादर करणारी बँक ग्राहकांना तासाभरात संबधितांच्या खात्यावर पैसे वर्ग करू शकते.
बॅंकींग व्यवहाराला गती येण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चांगले पाऊल उचलले आहे. ही प्रणाली सुरू आहे, पण काही वेळा चेक स्कॅन करून क्लिअरींग हाऊसकडे पाठवल्यानंतर क्लिअरन्स किंवा रिजेक्शनची पुष्टी मिळत नसल्याने ही अडचण येत आहे. पण, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. - जी. एम. शिंदे (मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक)