कोल्हापुरात शासकीय दवाखान्यातल्या फ्रीजमध्ये चक्क भाजी, किस्से ऐकून आरोग्यमंत्रीही अवाक्
By समीर देशपांडे | Updated: October 1, 2025 19:09 IST2025-10-01T19:08:43+5:302025-10-01T19:09:12+5:30
सहा महिने यंत्रसामुग्री विनावापर

कोल्हापुरात शासकीय दवाखान्यातल्या फ्रीजमध्ये चक्क भाजी, किस्से ऐकून आरोग्यमंत्रीही अवाक्
समीर देशपांडे
कोल्हापूर : सकाळी दवाखान्यात येताना भाजी आणायची. तिथेच नीट करायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची असे प्रकार घडत आहेत. एका ग्रामीण रुग्णालयात पंधरा दिवसांपूर्वी भेट दिली तर फ्रीजमध्ये पेरू ठेवला होता. तर कोकणातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रामधील बाळंतपणासाठी वापरण्यात येणारा कीट ६ जूननंतर वापरासाठी फोडलाच नाही, असे एक एक किस्से आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने सांगत होते आणि दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली.
चार जिल्ह्यातील कार्यशाळेतील रोखठोक सादरीकरण चर्चेचा विषय ठरले. चारही जिल्ह्यातील बहुतांशी दवाखान्यांमध्ये प्रसूतीचे प्रमाण कमी आहे. आठ प्रोग्राममध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात १९ व्या नंबरवर असल्याचे सांगण्यात आले. तेव्हाही आबिटकर यांनी ‘हे असे का’ अशी अधिकाऱ्यांना विचारणा केली. सांगली जिल्ह्यातील बेळंकी येथील रुग्णालयाला भेट दिल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकारी बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. जेव्हा वरिष्ठ अधिकारी त्या बैठकीच्या ठिकाणीही त्या आल्या नव्हत्या. अशी दिशाभूल करणारी माहिती कशी दिली जाते, याचे उदाहरणच यावेळी देण्यात आले.
आमच्या दवाखान्यापासून शहर जवळ असल्याने आमच्याकडे प्रसूतीलाच कोणी येत नाहीत असे दोन, तीन डॉक्टरांनी यावेळी सांगितले. असे असेल तर मग तो दवाखाना तरी त्या ठिकाणी कशाला पाहिजे आणि तुम्ही तरी तिथे नोकरी कशासाठी करायची, असा प्रश्न आबिटकर यांनी उपस्थित केला. काही ठिकाणी निकषांपेक्षा प्रसूती अधिक होते. मग तुमच्याकडेेच असे का, असे विचारल्यानंतर मात्र डॉक्टर निरुत्तर होत होते.
मी त्यावेळी नव्हते, नव्हतो
जेव्हा काही दवाखान्यांतील प्रसूतीचे प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगण्यात आले तेव्हा संबंधित डॉक्टर मी आत्ताच हजर झालो आहे किंवा हजर झाली आहे असे सांगत होते. यापुढे प्रसूतीचे प्रमाण वाढवले जाईल, असे आश्वासन देेऊन सर्वजण खाली बसत होते.
आकडेवारीचा घोळ
सादरीकरणावेळी काही दवाखान्यांमध्ये प्रसूती ० दाखवली जात होती. तर डॉक्टर खालून अहो आम्ही तीन, चार प्रसूती केल्यात असे सांगत होते. तेव्हा नुसत्या प्रसूती करून चालणार नाही ऑनलाईन पोर्टलवर त्या भरल्याही पाहिजेत, अशी सूचना यावेळी देण्यात आली.
अडचणीही जाणून घेतल्या
चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन करतानाच यावेळी डॉक्टर, तेथील मनुष्यबळ, रुग्णवाहिका चालकांच्या अडचणी याबाबत आरोग्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कार्यक्रम संपल्यानंतर अडचणी ऐकण्यासाठीही स्वतंत्र दहा मिनिटे त्यांनी दिली.