स्वातंत्र्यानंतरही शिवरायांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:48 IST2025-12-16T12:47:16+5:302025-12-16T12:48:21+5:30
सीबीएसई अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल, इचलकरंजीत शंभूतीर्थचे लोकार्पण

स्वातंत्र्यानंतरही शिवरायांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इचलकरंजी : ‘स्वातंत्र्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला. सीबीएसई अभ्यासक्रमातील इतिहासात १७ पाने मुघलांचा इतिहास आणि केवळ १ पॅराग्राफमध्ये छत्रपतींचा उल्लेख केला होता. मोदी सरकारने तो बदलला आणि छत्रपतींच्या इतिहासाला २१ पाने दिली आणि मुघली साम्राज्य एका पॅराग्राफमध्ये आणले. आपल्यालाही जातीपातीच्या भिंती तोडून एक राहावे लागेल. महाराजांचा इतिहास आणि आपले हिंदुत्व कायमस्वरूपी जागृत ठेवावे लागेल’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील के. एल. मलाबादे चौकात साकारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अर्थातच शंभूतीर्थचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवप्रतिष्ठान-हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, ‘देव-देश आणि धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा केवळ पुतळा नसून प्रेरणा आहे. स्वराज्यासाठी निर्माण केलेल्या इतिहासाचे स्मरण आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे स्मारक आहे. छत्रपतींच्या निधनानंतर महाराष्ट्र काबीज करू, अशी धारणा बनवलेल्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात मराठ्यांनी खोदली, हा इतिहास आहे.’
सुरुवातीला रिमोटद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. आमदार राहुल आवाडे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्त भगवे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हा लोकोत्सव बनला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा याच चौकात व्हावा, यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे हे सातत्याने आग्रही होते आणि सर्वांच्या सहभागातून तो याठिकाणी उभारण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरूजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सांगितला.
कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोक माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, गजानन महाजन गुरूजी, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, आदी उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी आभार मानले.
मंत्री पाटील यांची महत्त्वाची भूमिका
प्रमुख अतिथी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रम वेळेत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत सूत्रसंचालकाची सूत्रे स्वत:च हातात घेतली.
परवानगी आणि उभारणीचा उल्लेख
शंभूतीर्थाच्या उभारणीसाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून अवघ्या एका दिवसात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली. तर आयुक्त पल्लवी पाटील यांनी साडेआठ महिन्यांत हे काम पूर्णत्वास नेल्याचे सांगण्यात आले.
नेत्रदीपक आतषबाजी व विद्युत रोषणाई
शंभूतीर्थाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा सकाळी पार पडल्यानंतर संध्याकाळी शंभूतीर्थ परिसरात भव्य विद्युत रोषणाई आणि नेत्रदीपक आतषबाजीने संपूर्ण शहर प्रकाशमय झाले होते.