Kolhapur: टोप-कासारवाडी गौण खनिजच्या इटीएस मोजणी, दंडात्मक नोटिसांचे दप्तर गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:23 IST2025-07-16T19:22:31+5:302025-07-16T19:23:25+5:30
गौण खनिज आणि हेलिकॉप्टर प्रश्न विधिमंडळात गाजल्यानंतर महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले

संग्रहित छाया
दत्ता बिडकर
हातकणंगले : टोप-कासारवाडीसह तालुक्यातील क्रशर चालकांनी शासनाची (रॉयल्टी)स्वामित्व कर चुकवून ३ लाख ३० हजार ब्रासचे जादा गौण खनिज उत्खनन केले होते. त्या क्रशर चालकांना जुलै २०२३ मध्ये २३१ कोटींच्या वसुली नोटिसा तत्कालीन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी दिल्या होत्या.
क्रशरचालकांची इटीएस मोजणी प्रकरणे आणि वसुलीच्या दंडात्मक नोटिसांचे दप्तर गौण खनिज टेबल सांभाळणाऱ्या महसूल सहायकाने गायब केल्याने तहसील प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. संबंधित महसूल सहायकाला दप्तर तत्काळ हजर करण्याणेचे आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यातील टोप-कासारवाडीचा गौण खनिज आणि हेलिकॉप्टर प्रश्न विधिमंडळात गाजल्यानंतर महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मागील आठवडयात तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडलाधिकारी व तलाठी यांनी भल्यापहाटे छापेमारी करून ३४ क्रशर सील केले आहेत.
विधिमंडळात उपस्थित झालेला गौण खनिजचा विषय जून-जुलै २०२३ मध्ये प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी तालुक्याचे ४५ दिवसांचे प्रशासन चालवले त्यावेळचा आहे.
टोप-कासारवाडीसह तालुक्यातील क्रशरचालक आणि दगडखाण मालक यांनी शासनाची गौण खनिजची मोठी लूट केल्याचे प्रकरण त्यांनी उघड केले होते. ११ जुलै ते १५ जुलै २०२३ या कालावधीमध्ये त्यांनी दगडखाणीच्या गट नंबरची उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालक, पुणे यांच्यामार्फत इलेक्ट्रोल टोटल स्टेशन प्रणालीद्वारे (इटीएस) मोजणी करून गौण खनिजच्या लुटीचे बिंग फोडले होते.
या गावातील दगडखाणीच्या गट नंबरची झाली होती इटीएस मोजणी
टोप, कासारवाडी, तासगाव, पेठवडगाव, मिणचे, मजले
क्रशरचालकांनी शासनाकडे भरलेली रॉयल्टी
- गौण खनिज ब्रास = १ लाख ८५ हजार ८८८
- प्रत्यक्ष जादा उत्खनन ब्रास - ३ लाख ३० हजार
- रॉयल्टी भरणा पेक्षा २० ते ३० पट जादा उत्खनन
पांच पट दंडात्मक कारवाई नोटिसा
प्रतिब्रास- ७ हजारांप्रमाणे
दंडात्मक रक्कम २३१ कोटी ३० लाख
टोप-कासारवाडी परिसरातील क्रशर सील केले आहेत. त्यांची रॉयल्टी भरणा आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची इटीएस मोजणी होणार आहे. २०२३ ला मोजणी झाली होती. गौण खनिजच्या महसूल सहाय्यकाची बदली झाली आहे. इटीएस मोजणी आणि दंडात्मक कारवाईच्या नोटिसांबाबतचे संपूर्ण दप्तर महसूल सहायकाकडे आहे. त्याने ते तत्काळ जमा करण्यासाठी लेखी आदेश दिलेले आहेत. दप्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई होईल. - सुशील बेल्हेकर, तहसीलदार