अभियांत्रिकीचा पसंतीक्रम सुरू
By Admin | Updated: July 14, 2014 01:02 IST2014-07-14T00:48:38+5:302014-07-14T01:02:21+5:30
प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार

अभियांत्रिकीचा पसंतीक्रम सुरू
कोल्हापूर : प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेतील महाविद्यालये निवडण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या फेरीला आज, रविवारपासून सुरुवात झाली. त्यात आॅनलाईन पद्धतीने विविध महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी (दि. १५) पर्यंत आहे. यावर्षी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत.
यातील पहिल्या फेरीत पसंतीक्रम देणे विद्यार्थ्यांना सक्तीचे आहे. त्यात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शंभर पसंतीक्रम भरता येणार आहेत. दुसऱ्या फेरीत पहिले सात पसंतीक्रम सक्तीचे केले आहेत. तिसरी फेरी यावर्षी पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या सहा केंद्रांवर होणार आहे. दरम्यान, आज सुटी असूनदेखील शहरातील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान अधिविभागातील अर्ज स्वीकृती केंद्रे (एआरसी) सुरू होती. इंटरनेटची सुविधा असलेल्या ठिकाणी पसंतीक्रम भरण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होती.