Emphasize increasing tracing, testing and surveying: Satej Patil | ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्या : सतेज पाटील

ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्या : सतेज पाटील

ठळक मुद्दे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्या : सतेज पाटील शुक्रवारपर्यंत लसीकरण होण्याची विभाग प्रमुखांवर जबाबदारी : पालकमंत्री 

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्व्हेक्षण वाढवण्यावर भर द्या. ज्या अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी झालेली आहे, त्यांचे लसीकरण शुक्रवारपर्यंत होण्याची जबाबदारी त्या-त्या विभाग प्रमुखांच्यावर आहे, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी सर्व प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे बैठक घेण्यात आली.

या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, विदर्भात रूग्ण संख्या वाढते. पूर्वतयारी म्हणून आपल्यालाही सतर्क रहावे लागेल. उपलब्ध असणाऱ्या साधनसामुग्री यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.  सुस्थितीत ठेवण्याबाबत नियंत्रण करावे. प्रत्येक तालुक्यात एक कोव्हिड काळजी केंद्र सुरू करता येईल याबाबत तयारी ठेवावी.

पुन्हा एकदा सर्व्हेक्षणावर भर द्यावा. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्यावरही भर हवा. प्रमुख शहरातील खासगी लॅबवर लक्ष देणं आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या लॅबला भेटी द्याव्यात. आतापर्यंत सर्वांनी मिळून चांगले काम केले आहे, यापुढेही करूया, त्यासाठी सर्वांनी दक्षता बाळगूया, असेही ते म्हणाले.

शुक्रवारपर्यंत लसीकरण होण्याची विभाग प्रमुखांची जबाबदारी-पालकमंत्री

लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या फ्रंटलाईन वर्कर्सचे शुक्रवारपर्यंत 100 टक्के लसीकरण व्हायला हवे. त्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर राहील. जे लसीकरण घेणार नाहीत त्यांच्या नावासह खुलासा विभाग प्रमुखांनी सादर करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

विना मास्क असणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल यंत्रणेने कारवाई करावी. विना मास्क असणाऱ्यांना दुकानदारांनी प्रवेश देऊ नये. आपण सर्वांनीही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचा वापर करावा. स्वत:हून लोकांनी उपाययोजना करावी, नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री  पाटील यांनी केले.

तालुकास्तरावर सीसीसीची तयारी ठेवावी- यड्रावकर

विदर्भातील वाढती रूग्णसंख्या पाहून जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय आणि नियोजनासाठी तालुका स्तरावर कोव्हिड काळजी केंद्राची तयारी ठेवण्याची सूचना दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. वाढती रूग्णसंख्या पाहता राज्यस्तरावर आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे. त्याच पध्दतीने जिल्ह्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आपली आणि आपल्या कुटूंबियांची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, प्रत्येक तालुक्यात एक तपासणी केंद्र हवे. त्यामध्ये सुविधा हवी. त्यादृष्टिने नियोजन करावे. आशा सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत इली, सारीचे रूग्ण शोधून त्यांची तपासणी करावी. प्रत्येक तालुक्याचा आढावा घेऊन पूर्ण नियोजन करावे.

खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांची तपासणीही करून त्यांचीही आरटीपीसीआर तपासणी झाली पाहीजे, त्याबाबत पत्रे द्यावीत. मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणं, सॅनिटायझेशनचा वापर या त्रिसुत्रीचा वापर व्हायला हवा. आस्थापनांबाबतही समुपदेशन, प्रबोधन त्यानंतर नोटीसा देणं आणि दंड करणं आणि प्रसंगी परवाना रद्द करणं अशा पध्दतीने अंमलबजावणी करावी. सर्वांनी आतापासून काळजी घ्यायला सुरूवात करा, असेही ते म्हणाले.

  महापालिका आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, कॉन्टॅक्ट ट्रेंसिंग किमान 20 पेक्षा जास्त व्हायला हवे. पोलीसांच्या मदतीने कारवाई करा. नियमांचे उल्लंघन होणार नाही हे पहा. कोचिंग क्लासेस अशा ठिकाणी तपासणी करा.

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाई करा. हॉटेल, खानावळी याबाबत अधिक काळजी घ्या. नियमानुसार दक्षता घेतली जाते का ते पहा. सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे. स्वत:ची सुरक्षा सर्वांत महत्वाची आहे. त्यासाठी लसीकरणाची संधी उपलब्ध झाली आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे.

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, जिल्ह्यामध्ये चांगले काम केले आहे. त्याच पध्दतीने एकत्रित मिळून आत्ताही काम करावे. कोणत्याही यंत्रणेकडून तक्रार येताच संबंधितावर पोलीसांनी कारवाई करावी. विना मास्कवर प्रभावीपणे कारवाई करावी. लसीकरण वाढवावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी यावेळी तालुकानिहाय सविस्तर आढावा घेऊन सूचना केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Emphasize increasing tracing, testing and surveying: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.