मराठ्यांचा जानेवारीत पुन्हा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:27 AM2017-10-16T00:27:36+5:302017-10-16T00:27:40+5:30

Elgar in Maratha again in January | मराठ्यांचा जानेवारीत पुन्हा एल्गार

मराठ्यांचा जानेवारीत पुन्हा एल्गार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्याचा निर्णय रविवारी येथे घेण्यात आला. सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.
मराठा क्रांती मूक मोर्चाला रविवारी वर्षपूर्ती झाली. या मोर्चाचे फलित काय, याचा ऊहापोह करून पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा महासंघातर्फे शाहू स्मारक भवन येथे मराठा जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, प्राचार्य शिवाजी भुकेले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, प्रा. विद्या साळोखे, व्ही. के. पाटील, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, उत्तम जाधव, प्रदीप पाटील, सुनील पाटील, दत्ता पाटील, डॉ. संदीप पाटील, आदींची होती.
मेळाव्यात जिल्ह्याच्या कानाकोपºयातून आलेल्या मराठा बांधवांनी सरकारविरोधात ‘मूक मोर्चा नको, ठोक मोर्चा’ काढूया अशा भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर इंद्रजित शिरगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन वसंतराव मुळीक यांना तलवार भेट देऊन ‘आरक्षण मिळाल्याशिवाय तलवार म्यान करायची नाही,’ अशी मागणी केली. लाखोंचे मोर्चे निघूनही समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे शासनावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल करीत सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला. मराठ्यांच्या मागण्यांसंदर्भात समाजाच्या भावना लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑाची विराट सभा घेण्याचे मुळीक यांनी जाहीर केले. या कालावधीत सरकारने मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे सांगत मागण्या मान्य झाल्याशिवाय तलवार म्यान करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सतेज पाटील म्हणाले, मराठा मूक मोर्चाचा आवाज बहुधा सरकारच्या कानांवर गेलेला दिसत नाही. त्यामुळे तेव्हा जर घोषणांचे मोर्चे काढले असते तर या सरकारचे कान बधिर होऊन काहीतरी निर्णय झाला असता. शांततेच्या मार्गाने आम्हाला यश मिळेल असे वाटत होते; परंतु हे कलियुग आहे; त्यामुळे शांत राहून चालणार नाही. आपल्याला संघर्ष करावा लागेल. राजेश क्षीरसागर म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर जाट, गुर्जर, राजपूत यांच्याप्रमाणे मराठ्यांना पेटून उठावे लागेल. सरकारला आरक्षण द्यायचे असते तर आतापर्यंत दिले असते.यावेळी मारुती मोरे, दत्ता पाटील, रविराज निंबाळकर, चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
तेलही गेले, तूपही गेले
प्राचार्य भुकेले म्हणाले, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जेवढ्या घोषणा केल्या, त्याचे फलित म्हणजे ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले,’ असे आहे.

Web Title: Elgar in Maratha again in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.