कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात एल्गार, पालकमंत्र्यांसमोरच आमदार नरके, महाडिक यांचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:45 IST2025-02-03T11:44:17+5:302025-02-03T11:45:00+5:30
पालकमंत्री आबिटकर यांचीही सावध भूमिका

कोल्हापूरच्या हद्दवाढविरोधात एल्गार, पालकमंत्र्यांसमोरच आमदार नरके, महाडिक यांचा आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : शहरातून ग्रामीण भागात राहायला येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पूर्वी शहरात जात होते ते आता गावाकडे येत आहेत. उलटा प्रवास सुरू आहे. यामुळे हद्दवाढीस ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. विरोध डावलून हद्दवाढ केल्यास आक्रमकपणे आंदोलन केले जाईल, असा थेट इशारा रविवारी शिंदेसेनेचे म्हणजे स्वपक्षाचेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना रविवारी दिला.
यावेळी उपस्थित असलेले भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी येथे जाहीर भाष्य केले नाही. पण त्यांचे समर्थक सरपंच आक्रमकपणे हद्दवाढीला विरोध केला. महायुतीतील आमदार नरके, महाडिक यांनी हद्दवाढविरोधी एल्गार पुकारल्याने पालकमंत्री आबिटकर यांना सावध पवित्रा घ्यावा लागला. त्यांनी या दोन आमदार आणि हद्दवाढविरोधी सरपंच यांच्यासमोर अधिक काही भाष्य करणे टाळले.
पालकमंत्री आबिटकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी हद्दवाढविरोधी गावांतील सरपंचांचे शिष्टमंडळाने आमदार नरके, आमदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री आबिटकर, सहपालकमंत्री मिसाळ यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली.
आमदार नरके म्हणाले, मूळ शहराचा विकास झालेला नाही. अनेक प्रश्न जैसे थे आहेत. आता शहरातून ग्रामीण जाण्याचा ओघ वाढला आहे. यामुळे शहरालगतच्या गावांवर शहरातील लोकांमुळे अतिरिक्त ताण येत आहे. म्हणून शहराच्या जवळ असलेल्या गावांचा विकास होण्यासाठी प्राधिकरणाला दोन हजार कोटींचा निधी द्यावा. प्राधिकरण सक्षम करावे. यासाठी नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घ्यावी.
यावेळी पाचगाव सरपंच प्रियंका पाटील, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण उचगाव सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडी सरपंच उत्तम आंबवडे, पाचगावचे नारायण गाडगीळ, मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, बालिंगे सरपंच राखी भवड, माजी सरपंच मयूर जांभळे, पूजा जांभळे, वाडीपीरचे सरपंच अनिता खोत, उपसरपंच सागर लाड, नागदेवाडी सरपंच अमृता पोवार, वडणगे सरपंच संगीता पाटील, आंबेवाडी सरपंच सुनंदा पाटील, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उचगाव सरपंच मधुकर चव्हाण आदी उपस्थित होते.
आम्ही काय अतिरेकी आहे का?
हद्दवाढविरोधी गावांतील सरपंच मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले होते. तेथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. आमदार नरके यांनीही इतका बंदोबस्त कशासाठी, अशी विचारणा केली. अनेक उपस्थित सरपंचांनी आम्ही काय अतिरेकी आहे का? अशीही विचारणाही केली.
सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढीचा निर्णय
पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शहरातील कृती समिती हद्दवाढीची मागणी करीत आहे, तर शहरालगतची गावे विरोध करीत आहेत. हद्दवाढीच्या विरोधासाठी काही लोकप्रतिनिधींनीही भेट घेतली आहे. यामुळे हद्दवाढीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल.