कोल्हापूर, सांगलीतील ८८ गावांत सौरऊर्जेवर वीजनिर्मिती होणार; जमिनीचा शोध सुरु
By भीमगोंड देसाई | Updated: July 14, 2025 17:58 IST2025-07-14T17:57:27+5:302025-07-14T17:58:54+5:30
३७७ मेगावॅटचे उद्दिष्ट, कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा शक्य

कोल्हापूर, सांगलीतील ८८ गावांत सौरऊर्जेवर वीजनिर्मिती होणार; जमिनीचा शोध सुरु
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ५४, तर सांगलीतील ३४ गावांत मुख्यमंत्री सौरकृषिवाहिनी योजनेतून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातून सौरऊर्जेवर ३७७ मेगावॅट विजेची निर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे. इतकी वीज तयार झाली तर त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे वीज प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रकल्प उभारण्यासाठी ८८ गावांत शासकीय जमिनीचा शोध घेतला जात आहे.
राज्यात सध्या कृषिपंपांना रात्री वीज दिली जाते. कृषिपंपधारकांना रात्रीचे पिकांना पाणी देणे प्रचंड त्रासदायक होत आहे. यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा, अशी कृषिपंपधारकांची मागणी आहे. यासाठी गावागावांत मुख्यमंत्री सौरकृषिवीजवाहिनी योजनेतून सोलर प्रकल्प उभारले जात आहेत.
हरोली (जि. कोल्हापूर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आळते, सातवे, किणी, हरळी, नरंदे येथेही सौरऊर्जेची निर्मिती केली जात आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यात ५४ आणि सांगली जिल्ह्यात ३४ गावांत असे आणखी सौरप्रकल्प उभारण्यात येणार आहे.
पाच प्रकल्पांमुळे दिवसा वीज
कोल्हापूर जिल्ह्यातील पाच सौरप्रकल्पांत तयार होणाऱ्या विजेमुळे परिसरातील ६ हजार ३५० शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीज मिळत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सौरप्रकल्प प्रस्तावित असलेल्या गावांची संख्या अशी
आजरा : हरपवडे, उत्तूर, मुम्मेवाडी. चंदगड : कोवाड, चुनरीचवाडा, कार्जिने, आमरोळी, मोरेवाडी, उत्साळी, जंगमहट्टी, पार्लेे, डुक्करवाडी. गडहिंग्लज - महागाव, शेंद्री, हनिमनाळ, हसूरचंपू, रेळेवाडी, पोशारातवाडी, हरळी बुद्रुक. करवीर : बहिरेश्वर, अडूर. हातकणंगले : हेर्लेे, आळते, किणी, नरंदे, रेंदाळ, नेज, म्हाळुंगे, हरोली. शिरोळ : अब्दुललाट, कोथळी, गगनबावडा. पन्हाळा : पिसात्री, माजगाव, सावर्डे तर्फ सातवे, हरपवडे, परखंदळे, गोळीवडे, आळवे. शाहूवाडी : कोळगाव, सरूड, मांजरे, वारूळ, बामणे, तिरवडे, शेनोळी, नरतवडे, बामणी, केनवडे.