पावसाळ्यातही सहकारी संस्थांच्या निवडणुका, कोल्हापूर जिल्ह्यात ५० संस्थांची प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:32 IST2025-07-31T15:32:13+5:302025-07-31T15:32:34+5:30
ऑक्टोबरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी

पावसाळ्यातही सहकारी संस्थांच्या निवडणुका, कोल्हापूर जिल्ह्यात ५० संस्थांची प्रक्रिया सुरू
कोल्हापूर : ऐन पावसाळ्यातही राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. ऑक्टोबरनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असल्याने त्या कालावधीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेता येणार नसल्याने राज्य सहकारी प्राधीकरणाने हा निर्णय घेतला आहे.
कोरोनापासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मुदत होऊ शकलेल्या नाहीत. कोरोना काळात दीड वर्ष प्रक्रिया ठप्प होती, त्याचा परिणाम पुढे दोन वर्षे राहिला. संस्थांच्या निवडणुका लांबत गेल्याने एका एका संस्थेचे संचालक मंडळ सात आठ वर्षे राहिले आहे. साधारणता ऑक्टोबर ते जूनपर्यंतच निवडणुका घेतल्या जातात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सगळीकडेच पाऊस असल्याने या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. पण यंदा जुलैसंपत आला तरी सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरूच आहेत. याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कारण आहे.
महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेसह हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून, साधारणता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरक्षण सोडत होऊ शकते. आगामी दिवाळी सण पाहता, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या संस्थांचे बिगुल वाजणार, हे निश्चित आहे. या कालावधीत सहकारी संस्थांच्या निवडणुका घेता येणार नसल्याने प्राधीकरणाने पावसाळ्यातही निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.
जिल्ह्यात ५० संस्थांची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात ‘ब’ वर्गातील २९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर दुग्ध विभागाकडूनही निवडणुकांचे काम सुरू आहे. साधारणत: ५० हून अधिक संस्थांची प्रक्रिया सुरू आहे.