सरपंच आरक्षण गृहीत धरून निवडणुकीचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:52+5:302020-12-24T04:21:52+5:30
संदीप बावचे : शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील पंधरा वर्षांतील सरपंचपदाचे आरक्षण रोटेशन पद्धतीने गृहीत ...

सरपंच आरक्षण गृहीत धरून निवडणुकीचा प्रचार
संदीप बावचे : शिरोळ
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील पंधरा वर्षांतील सरपंचपदाचे आरक्षण रोटेशन पद्धतीने गृहीत धरून आघाड्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी, यासाठी गावपुढाऱ्यांना केंद्रीत केले आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी सोयीनुसार आघाड्या निश्चित झाल्या असून स्थानिक नेते शांत असले तरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
शिरोळ तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे रणांगण सुरू झाले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी व शिवसेनेला काही जागा मिळाल्या होत्या. पक्षापेक्षा नेत्यांनी सोयीच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक आघाड्या केल्यामुळे निवडणुकीचा निकाल राजकीय ताकद दाखविणारा ठरला होता.
दरम्यान, राज्यातील सत्ता बदलामुळे तालुक्यातील राजकारणातदेखील बदल झाला आहे. काँग्रेससह स्वाभिमानी, शिवसेना, भाजप व यड्रावकर गटाने सावध भूमिका घेत सोयीनुसार आघाड्या केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, अनिल यादव यांची व्यूहरचना यशस्वी ठरली असली तरी ग्रामपंचायतींवर बहुमत मिळविण्यासाठी गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
चौकट -
आरक्षणावरून राजकीय गणिते
निवडणुका झाल्यानंतर सरपंच आरक्षण जाहीर होणार असल्याने उत्साह नसला तरी मागील पंधरा वर्षांतील रोटेशन पद्धतीने झालेले आरक्षण गृहीत धरले जात आहे. त्यानुसार सरपंचपदाच्या आरक्षणाचा अंदाज ठरवून राजकीय गणिते मांडली जात आहेत. सरपंच आरक्षण नसल्यामुळे बहुमत मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून व्यूहरचना आखली जात आहे.
लक्षवेधी लढती
अर्जुनवाडसह, नांदणी, उदगांव, कोथळी, दानोळी, चिपरी, दत्तवाड, यड्राव, शिरदवाड, शिरढोण, धरणगुत्ती या गावांतील लढती लक्षवेधी होणार आहेत.