कोल्हापूर: मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोलीतील वयोवृद्ध शेतकरी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 14:29 IST2022-10-22T14:29:43+5:302022-10-22T14:29:59+5:30
शेतातील घरात मृतावस्थेत आढळून आले. सकाळपर्यंत त्यांच्या मृतदेहाशेजारी मधमाशा घोंगावत होत्या.

कोल्हापूर: मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोलीतील वयोवृद्ध शेतकरी ठार
सदाशिव मोरे
आजरा : मधमाशांच्या हल्ल्यात मेंढोली ( ता.आजरा ) येथील नानू जोतिबा कोकीतकर (वय ८०) हे वयोवृद्ध शेतकरी ठार झाले. ते शेळी चारण्यासाठी गेले असता मधमाश्यांनी सहा शेळ्यांसह त्यांच्यावर हल्ला केला.
मेंढोली येथील "काळवाट" नावाच्या शेतात नानू कोकितकर शेळ्या चारण्यासाठी काल गेले होते. नेहमीप्रमाणे आजऱ्याचा शुक्रवारी आठवडा बाजारादिवशी ते घरी न येता शेतातच थांबत होते. आज सकाळी घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. ते शेतातील घरात मृतावस्थेत आढळून आले. सकाळपर्यंत त्यांच्या मृतदेहाशेजारी मधमाशा घोंगावत होत्या. शेळ्याही मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वयोवृद्ध शेतकऱ्याचा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ऐन दिवाळीत नानू कोकीतकर यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.