नगरपालिका शाळेत आठवीचा वर्ग सुरू होणार
By Admin | Updated: May 8, 2017 00:59 IST2017-05-08T00:59:47+5:302017-05-08T00:59:47+5:30
नगरपालिका शाळेत आठवीचा वर्ग सुरू होणार

नगरपालिका शाळेत आठवीचा वर्ग सुरू होणार
कागल नगरपालिका सभा : स्पर्धेत टिकून राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कागल नगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नगरपरिषद शाळेमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. येथील हिंदुराव घाटगे विद्यामंदिर येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून हा वर्ग सुरू करण्याचा मानस आहे. तसेच त्यानंतर नववी, दहावीसाठीही परवानगी घेण्यात येणार आहे.
कागल नगरपरिषदेच्या शहरात प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. पूर्वी जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या या शाळा नगरपरिषद शिक्षक मंडळाकडे वर्ग होऊन हे मंडळ कामकाज पाहत होते. आता शासनाने शिक्षण मंडळ ही संकल्पना बरखास्त केली आहे. नगरसेवकांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. कागल शहरात चार विद्यालये, दोन इंंग्लिश मीडियम शाळा तसेच खासगी प्राथमिक शाळा तीन यांच्याशी स्पर्धा करीत हे नगरपरिषदेच्या शाळा अजून टिकून आहेत. कारण शहरातील ‘नाही रे’ वर्गातील गोरगरीब मुले येथे मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतात. शासनाने पहिली ते आठवी हे शिक्षण ‘प्राथमिक’ म्हणून गणले असल्याने याचा विचार करून हा वर्ग सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. तसेच खासगी शिक्षण संस्था इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी विद्यार्थी जादा मिळावेत म्हणून पहिलीपासूनच आपल्या संस्थेशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे धोरण राबवीत आहेत. पर्यायाने नगरपालिका शाळेत विद्यार्थी संख्या घटत आहे. त्यामुळे आठवीचा वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला.
मान्यवरांचे येथे शिक्षण...
नामदार गोपाळकृष्ण गोखले, वसंतदादा पाटील, डॉ. आनंद यादव, एस. एम. मुश्रीफ असे दिग्गज तसेच विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आणि शहरातील त्यांचे समकालीन विविध मान्यवर या नगरपरिषद शाळेतच प्राथमिक शिक्षणाने समृद्ध झाले आहेत.
कागलकरांचा एक विशेष जिव्हाळा या शाळांप्रती आहे. हिंदुराव घाटगे शाळेची इमारत संस्थानकाळातील आहे. मात्र, सध्या येथील आजची पटसंख्या चिंताजनक आहे.