भीमगोंडा देसाई / कोल्हापूर आरोग्य विभागातर्फे महिला आरोग्य अभियानांतर्गत तपासलेल्या ३० वर्षांवरील महिलांपैकी आठ टक्के महिलांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याचे निदान झाले. सर्वाधिक महिला राधानगरी तालुक्यातील आहेत. वेळीच निदान झाल्यामुळे संबंधितांना आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यातर्फे त्यांना उपचारांसाठी मार्गदर्शन केले जात आहे. बहुतांश महिला स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष देत नाहीत. तीव्र स्वरूपाचा त्रास सुरू झाल्याशिवाय रुग्णालयाची पायरी चढण्याची मानसिकता महिलांमध्ये नसते. परिणामी उच्च रक्तदाबाचा आजार बळावल्यानंतर संबंंधित महिलेच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. मृत्यूचीही शक्यता असते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक व उपकेंद्रांतर्गत आरोग्य तपासणी अभियान घेतले. अभियानात जिल्ह्यात तीस वर्षांवरील १० हजार ७३६ महिलांची आरोग्य तपासणी झाली. यामध्ये १७६१ महिलांना मधुमेहाची लक्षणे दिसली. ६१६ जणींना मधुमेह असल्याचे निदान झाले. ३ हजार ७६२ महिलांना हृदयविकाराची लक्षणे दिसली. तपासणीनंतर ८१२ जणींना हृदयविकार असल्याचे निदान झाले. अभियानातून मोफत आरोग्य तपासणी झाल्यामुळे महिलांची ही भयावह स्थिती समोर आली. आरोग्याला अतिशय घातक असे हे दोन्ही आजार जिल्ह्यात तब्बल आठ टक्के महिलांना असल्याच्या धक्कादायक माहितीवरून महिला आपल्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष करतात, हेही स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे कधी मधुमेह आधी होतो, तर पाठोपाठ उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. काहीजणींना उच्च रक्तदाब आधी आणि नंतर मधुमेह होतो. बदललेली जीवनशैली, अतिताण, व्यायाम व सकस आहाराचा अभाव या महत्त्वाच्या कारणांमुळे दोन्ही होतात. याबद्दल माहिती असूनही परिस्थिती व अपरिहार्यता यांमुळे शरीराला अपायकारक कारणे अनेकांना टाळता येत नाहीत. मात्र वेळीच निदान होऊन उपचार सुरू झाल्यास जीविताचा धोका टाळणे शक्य आहे, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
आठ टक्के महिलांना मधुमेह, उच्च रक्तदाब
By admin | Updated: April 5, 2015 00:30 IST