पासिंग बंदमुळे आर्थिक भुर्दंड
By Admin | Updated: December 5, 2014 23:39 IST2014-12-05T20:43:26+5:302014-12-05T23:39:28+5:30
सहा ठिकाणचे कॅम्प बंद : कोल्हापूरला फेऱ्या गैरसोयीच्या आणि खर्चीक

पासिंग बंदमुळे आर्थिक भुर्दंड
जयसिंगपूर : वाहनधारकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यात सहा ठिकाणी वाहन पासिंग कॅम्प होतात. शासनाच्या धोरणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या कॅम्पवर वाहनांचे पासिंग करणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कोल्हापूरला जाऊन पासिंग करणे अत्यंत गैरसोयीचे आणि खर्र्चीक ठरत आहे.
वाहनधारकांकडून पर्यावरण कर, व्यवसाय कर, रोड टॅक्स, टोल नाक्यावरील टोल, अवाजवी विमा, आदीं कर शासनाकडून वसूल केला जातो. अवजड वाहतूक व्यवसायातील वाहने मंदीत असून, वाहनमालक व्यवसाय नसल्याने अडचणीत आले आहेत, अशा स्थितीत जुन्या वाहनांना पासिंग करताना प्रादेशिक परिवहन अधिकारी हॅँड ब्रेकची सक्ती करीत आहेत. त्यामुळे ही सक्ती रद्द करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
जयसिंगपूरसह जिल्ह्यात सहा ठिकाणी वाहनांचे पासिंग रद्द केल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हापूरला जाऊन पासिंग करणे, त्यासाठी लागणारा डिझेल खर्च आणि दिवसभराचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होत आहे. ट्रक व्यवसायात ७० टक्के वाहने ही मार्केटमध्ये जुनी आहेत. त्यामुळे जुन्या गाड्यांचे पासिंग नव्या गाड्यांप्रमाणेच लवकरात लवकर करून मिळावे आणि वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी बंद करण्यात आलेले पासिंग कॅम्प पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. दरम्यान, जयसिंगपूर येथील वाहनांचे पासिंग पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी कुमार पाटील यांनी परिवहन मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)