कोल्हापुरातील उच्चशिक्षण कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली बंद, सहसंचालकांना कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:13 IST2025-01-22T17:12:22+5:302025-01-22T17:13:19+5:30
उच्चशिक्षण संचालकांनी दाखविल्या त्रुटी : टपालाची नाही नोंद

कोल्हापुरातील उच्चशिक्षण कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली बंद, सहसंचालकांना कारणे दाखवा नोटीस
कोल्हापूर : कोल्हापुरातील उच्चशिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयातील ई-ऑफिस प्रणाली बंद असून कार्यालयातील टपालांची नोंदवहीत नोंद नसणे, प्रस्ताव प्रलंबित, दैनंदिन जमाखर्चाची रोखवहीत नोंद न करणे यासह सात विषयांमध्ये त्रुटी आढळल्याने उच्चशिक्षणचे कोल्हापूर विभागीय सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे यांना राज्याच्या उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी नोटीस बजावली.
डॉ. देवळाणकर यांनी ३ जानेवारीला कोल्हापूर विभागीय सहसंचालक कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला होता. यात त्यांना तपासणीच्या अनुषंगाने प्रशासकीय, वित्तीय व अन्य गंभीर बाबी आढळून आल्याने त्यांनी डॉ. नाकाडे यांना नोटीस दिली.
शासनाच्या दि. १८ जुलै २०२३ च्या परिपत्रकानुसार कोणत्याही परिस्थितीत नस्तीची कार्यवाही ऑफलाइन न करता केवळ ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. उच्चशिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयात ई-ऑफिसप्रणाली कार्यान्वित होती. मात्र, डॉ. नाकाडे हे २५ सप्टेंबर २०२४ रोजी रुजू झाल्यापासून या कार्यालयातील ई-ऑफिस प्रणाली सुरू नाही. ही बाब शिस्तीचा भंग करणारी असल्याचे या नोटिसीत म्हंटले आहे.
यावर घेतला आक्षेप
- आवक नोंदवहीत टपालाची नोंद केली नाही
- झिरो पेन्डसी मोहीम सुरू असताना अशासकीय अनुदानित महाविद्यालयांच्या शिक्षकीय पदभरती संगणकप्रणालीमध्ये नोव्हेंबर व डिसेंबर २०२४ मध्ये ३ प्रस्ताव अद्यापही कार्यवाहीविना प्रलंबित ठेवले.
कार्यालयातील संगणक जुने असल्याने ई-ऑफिस प्रणाली सुरू करता आली नव्हती. नव्या संगणकांची मागणी केली असून, ते उपलब्ध झाल्यानंतर ही प्रणाली सुरू करणार आहे. याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. -डॉ. धनराज नाकाडे, विभागीय सहसंचालक, उच्चशिक्षण विभाग, कोल्हापूर