पोलीस महासंचालकांवर हक्कभंग प्रस्ताव : क्षीरसागर
By Admin | Updated: April 8, 2015 00:35 IST2015-04-08T00:17:47+5:302015-04-08T00:35:34+5:30
गणेशोत्सव मिरवणूक लाठीमार प्रकरण

पोलीस महासंचालकांवर हक्कभंग प्रस्ताव : क्षीरसागर
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नागरिकांवर अमानुष लाठीमार करून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, पोलीस उपअधीक्षक वैशाली माने, पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर, मा. शा. पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्यास दिरंगाई केली. याप्रकरणी पोलीस महासंचालक संजीव दयाल आणि तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यावर मंगळवारी अधिवेशनामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. दरम्यान, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही उर्मट अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, यासाठी सभागृहातील सर्वच सदस्यांनी गदारोळ केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी आमदार क्षीरसागर यांना हक्कभंग प्रस्ताव सादर करण्याची अनुमती दिली. यावेळी आ. क्षीरसागर यांनी १८ सप्टेंबर २०१३ रोजीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान पापाची तिकटी येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर अचानक लाठीमार केला. त्यामध्ये लहान मुलांसह अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद देण्यासाठी ठाण्यात गेलो असता ती घेतली नाही. उलट माझ्यासह १५ कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. या घटनेनंतर १९ आॅक्टोबर २०१३ रोजी पोलीस महासंचालक दयाळ व विशेष पोलीस महानिरीक्षक चव्हाण यांच्याकडे ज्योतीप्रिया सिंग, वैशाली माने, संजय कुरुंदकर, मा. शा. पाटील यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून बेकायदेशीर केलेली सर्व प्रकरणे पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली तसेच अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रे पाठविली. परंतु कारवाईसाठी दिरंगाई केल्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकृत करावा, अशी मागणी केली. तो प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी स्वीकृत केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ाज्योतिप्रिया सिंग, वैशाली माने, संजय कुरुंदकरांसह मा. शा. पाटील यांना निलंबित करण्याची मागणी