आंबा (जि. कोल्हापूर): आंबा घाटातील कळकदरा येथील उजव्या कड्यावर दोन नर गव्यांची झुंज झाली. या झुंजीदरम्यान दोन्ही गवे कड्यावरून १०० फूट खाली थेट महामार्गावर कोसळले आणि जागीच ठार झाले. अंदाजे नऊ वर्षाच्या या गव्यांचे वजन प्रत्येकी १०० किलो आहे. कळकदरा येथे मुर्शी बांबू लागवडीचा भाग आणि संलग्न घनदाट जंगल असल्याने वन्यप्राण्यांची वर्दळ असते. घटनेच्या वेळी घाटात पाऊस व दाट धुके होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास घाटातील कामगार पोकलॅन व डंपरसोबत कामावर आले होते. त्याचवेळी गवे कड्यावरून कोसळले. कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली असता ते जागीच मृत झाल्याचे आढळले.
कड्याच्या कटाईमुळे व झाडी नष्ट झाल्याने तो भाग निसरडा झाला असून, झुंजीदरम्यान तोल जाऊन गवे खाली कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामगारांनी माहिती दिल्यानंतर रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.
चौपदरीकरणात डोंगराची केली जात आहे कटाई
कळकदरा येथील उजव्या बाजूचा कडा कट करून नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. महामार्गाशी संलग्न जंगल असल्याने वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. सुमारे १०० फूट कडा खोदून रुंदीकरण केले जात असून, कट केलेल्या कड्यावरून घसरून गवे कोसळल्याचा अंदाज आहे.
मृत गव्यांचे दाभोळे येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करून, नियमानुसार दहन करण्यात आले - न्हानू गावडे, वन अधिकारी