अतिक्रमण काढताना हमरीतुमरी, पोलिसांचा हस्तक्षेप : सहा केबिन हटविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:14 IST2019-07-10T14:11:57+5:302019-07-10T14:14:16+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सदर बाजार, मार्केट यार्ड परिसरातील सहा अवैध केबिन हटविण्यात आल्या. मार्केट यार्डसमोर पदपथावर उभ्या केलेल्या केबिन काढताना संबंधितांनी तीव्र विरोध केला. दोघेजण महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून विरोध करणाऱ्यांना बाजूला केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली.

अतिक्रमण काढताना हमरीतुमरी, पोलिसांचा हस्तक्षेप : सहा केबिन हटविल्या
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सदर बाजार, मार्केट यार्ड परिसरातील सहा अवैध केबिन हटविण्यात आल्या. मार्केट यार्डसमोर पदपथावर उभ्या केलेल्या केबिन काढताना संबंधितांनी तीव्र विरोध केला. दोघेजण महापालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून विरोध करणाऱ्यांना बाजूला केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अवैध केबिन, शेड, हातगाड्या हटविण्याची मोहीम सुरू असून, चारही विभागीय कार्यालयांनी ही मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डसमोरील पदपथावर अतिक्रमण केलेल्या दोन केबिन काढताना संबंधित केबिनधारकांनी तीव्र विरोध केला. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांनी वाद घातला. यावेळी कर्मचारी व केबिनधारक यांच्यात हमरीतुमरी झाली. दोन व्यक्ती कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या; त्यामुळे जोरदार वाद सुरू झाल्यावर शाहूपुरी पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला.
अतिक्रमण केलेल्या केबिन काढू नये, असे केबिनधारकांचे म्हणणे होते, तर अवैध तसेच परवाना नसलेल्या केबिन असल्यामुळे त्या काढाव्याच लागतील, अशी भूमिका महापालिका अधिकाऱ्यांनी घेतली. शहर उपअभियंता हर्षजित घाटगे यांनी संबंधितांना समजावल्यानंतर वाद शांत झाला. याचवेळी सदर बाजार परिसरात चार केबिन हटविण्यात आल्या.
विभागीय कार्यालय, अतिक्रमण निर्मूलन विभाग, पोलीस यांच्यातर्फे ही कारवाई पूर्ण करण्यात आली. उपशहर अभियंता घाटगे यांच्यासह कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, बाबूराव दबडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी या कारवाईत भाग घेतला.