कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार मतदारांची दुबार, तिबार नावे; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक, कुणी केला दावा.. वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:19 IST2025-10-11T19:19:17+5:302025-10-11T19:19:42+5:30

दुबार, तिबार नावांमुळेच विधानसभेच्या निकालावरही परिणाम 

Duplicate names of 61 thousand voters in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार मतदारांची दुबार, तिबार नावे; कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक, कुणी केला दावा.. वाचा 

संग्रहित छाया

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या मतदार यादीत ६१ हजार ८४४ इतक्या मतदारांची दुबार, तिबारसह ९ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नावे असल्याचा खळबळजनक दावा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य सतीशचंद्र कांबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. या दुबार, तिबार नावांमुळेच विधानसभेच्या निकालावरही परिणाम झाल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे.

कांबळे यांनी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदार यादीत किती जणांची नावे दुबार आहेत, याचे सर्वेक्षण केले असता ही आकडेवारी समोर आली आहे. याबाबत राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे १६ जुलै रोजी तक्रार करण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले.

कांबळे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदार यादीत काहीतरी घोळ झाल्याचा संशय होता. भाकपच्याही अनेक मतदारांची नावे आपोआप रद्द झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे संगणक प्रणालीचा आधार घेऊन मतदार यादीची पडताळणी केली असता, ६१ हजारांपेक्षा जास्त मतदारांची नावे दुबार, तिबार आढळली आहेत.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ११ हजार ७८६ दुबार, तिबार नावांपैकी ३ हजार ७४९ इतके मतदार बोगस आहेत. मतदार यादीत साडेतीन हजार मतदारांची नावे व व्यक्ती या एकच असल्याचे निदर्शनास आले. त्यांची नावे अनेक मतदारसंघात समाविष्ट आहेत. त्यामुळे या मतदारांनी नेमके किती ठिकाणी मतदान केले? असा सवालही कांबळे यांनी केला.

कोल्हापूर दक्षिणमध्ये संशयास्पद मतदार

कितीवेळा नावे  - किती मतदार

दुबार नावे - ३४०५
तीनवेळा नावे  - २७६
चारवेळा नाव  -  ५२
पाचवेळा नाव  -  ६
सहावेळा नाव  -  २
नऊवेळा नाव -  १९

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

मतदारसंघाचे नाव   -  दुबार-तिबार मतदार

कोल्हापूर दक्षिण  - ११७८६
करवीर - ११४७८
राधानगरी  - १०८६३
शाहूवाडी - ७२८९
कागल - ५०३१
चंदगड - ४३७९
हातकणंगले - ३४८४
इचलकरंजी - २५६७
कोल्हापूर उत्तर - १८५६
शिरोळ  - ३१११

मतदार यादी बिनचूक असल्याचा दावा निवडणूक आयोग वारंवार करते. मात्र, एका कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार मतदारांची नावे दुबार, तिबार असतील तर ही मतदार यादी किती सदोष आहे, हे लक्षात येते. याच दुबार-तिबार नावांमुळेच निकालावरही परिणाम झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ही नावे रद्द करावीत. - सतीशचंद्र कांबळे, प्रदेश कौन्सिल सदस्य, भाकप.
 

अशी काही तक्रार असेल तर डीएलओमार्फत मतदार यादीची पडताळणी करून पुढील कार्यवाही करू. - शक्ती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर

Web Title : कोल्हापुर: हजारों डुप्लिकेट मतदाता मिले, चुनाव परिणामों पर असर।

Web Summary : सीपीआई का आरोप है कि कोल्हापुर में 61,000 डुप्लिकेट मतदाता हैं, जिससे चुनाव परिणामों पर असर पड़ा। दक्षिण कोल्हापुर में सबसे अधिक विसंगतियां हैं। स्थानीय चुनावों से पहले जांच का अनुरोध किया गया है।

Web Title : Kolhapur: Thousands of duplicate voters found, impacting election results.

Web Summary : CPI alleges 61,000 duplicate voters in Kolhapur, impacting election outcomes. South Kolhapur has the most discrepancies. An investigation is requested before local elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.