डफ कडाडला; कोल्हापूरच्या दसरा चौकाला स्फुरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:00 IST2018-08-08T01:00:13+5:302018-08-08T01:00:18+5:30

डफ कडाडला; कोल्हापूरच्या दसरा चौकाला स्फुरण
कोल्हापूर : ‘या सरकारनं बरं नाही केलं गं बया
मराठ्यांना... मराठ्यांना फसवलं गं बया,
दोन महिन्यांची, चार वर्षं झाली गं बया,
आरक्षण कोर्टात अडकलं गं बया...’
अशा एक ना अनेक एक सुरेल आणि आक्रमक कवनांतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शाहिरांचा डफ मंगळवारी दसरा चौकामध्ये कडाडला.
आजवर अनेक लढ्यांमध्ये शाहिरांनी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे त्या लढ्यांना मोठी ताकद मिळाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शाहिरांची भूमिका निर्णयक ठरली. त्याच शाहिरांनी मंगळवारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये उडी घेतली. ऐतिहासिक दसरा चौकामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने हजारो मराठा बांधवांसमोर शाहिरांचा सरकारविरोधी डफ कडाडला. यामध्ये ‘जगायचं हाय काय मरायचं हाय,’ ‘आता काय मागं सरायचं नाय,’ ‘या सरकारला आता घेरायचं हाय’ अशी कवने सादर केली. तर ‘अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे,’ अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी शाहीर दिलीप सावंत, रंगराव पाटील, शहाजी माळी यांनी कवने सादर केली.
दिवसभरात विविध गावच्या ग्रामस्थांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा देत दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे आंदोलनाच्या चौदाव्या दिवशीही आंदोलनाची धार वाढल्याचे दिसून आले. गावागावांतून युवक भगव्या टोप्या परिधान करून, भगवे झेंडे फडकावीत दुचाकी रॅली, पायी चालत दसरा चौक येथे येत होते. त्याचबरोबर क्रांतिदिनी पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.