Kolhapur: ..अन् देव गावात येण्याच्या पर्वणीला नृसिंहवाडीकर मुकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:43 IST2025-08-23T19:41:42+5:302025-08-23T19:43:18+5:30
नृसिंहवाडी : कृष्णा नदीचे पाणी आल्यानंतर देव गावात येण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या गावात येणार या आनंदाने ...

Kolhapur: ..अन् देव गावात येण्याच्या पर्वणीला नृसिंहवाडीकर मुकले
नृसिंहवाडी : कृष्णा नदीचे पाणी आल्यानंतर देव गावात येण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या गावात येणार या आनंदाने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावत नाही. पुराने गेले काही वर्ष सलग उत्सव मूर्ती गावात येण्याचा आनंद वाडीकरांना मिळाला. यंदा संततधार पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होवून मंदिर पाण्याखाली गेले. मात्र, सद्या पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरु लागले. त्यामुळे देव गावात येण्याच्या पर्वणीला नृसिंहवाडीकर मुकले
कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले व दत्त महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यातून दत्तभक्त मोठ्या संख्येने येतात. देवस्थानला वेगळे धार्मिक अधिष्ठान असून आजही मंदिरात अनेक प्रथा परंपरा जपल्या जातात. हे तीर्थक्षेत्र कृष्णा व पंचगंगा नद्यांवर वसल्याने गावाला सातत्याने पुराला सामोरे जावे लागते. मात्र पुरातही येथील पुजारी व ग्रामस्थ प्रथा व परंपरा मोठ्या उत्साहाने जपतात.
कृष्णा नदीला पाणी वाढल्यास व महाराजांच्या मनोहर पादुकांचे जवळ पाणी आल्यास येथे दक्षिणद्वार सोहळा मोठया उत्साहात संपन्न होतो. यावेळी दर्शनासाठी व स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिरात पाणी आल्यास उत्सव मूर्ती मंदिराच्या सुरुवातीला असलेल्या टेंबे स्वामी मठात नेण्यात येते व त्या ठिकाणीच महाराजांची त्रिकाल पूजा अर्चा व धार्मिक विधी केले जातात. त्याठिकाणी ही पुराचे पाणी आल्यानंतर देव गावात येण्याची परंपरा आहे.
प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या गावात येणार या आनंदाने ग्रामस्थांचा आनंद गगनात मावत नाही. सुवासिनींकडून मंगल आरती केली जाते. पुजारी मंडळी उत्सवमूर्ती व सनकदिक देव आनंदाने मिरवणुकीने गावात आणतात. हा अभूतपूर्व सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो. नदीचे पाणी वाढल्यावर देव गावात आणले जातात तसेच पाणी कमी झाल्यावर दत्त मंदिरपूर्ण रिकामे होण्यापूर्वी देव पुन्हा मंदिरात आणले जातात. संततधार पावसामुळे यंदा मंदिर पाण्याखाली गेले मात्र पावसाचा जोर ओसरल्याने देव गावात येण्याच्या पर्वणीला नृसिंहवाडीकर मुकले.