Kolhapur: ‘लेखापरीक्षण’चे कर्मचारीच नसल्याने ‘गोकुळ’च्या चौकशीला मुहूर्त लागेना

By राजाराम लोंढे | Updated: September 16, 2025 13:49 IST2025-09-16T13:48:52+5:302025-09-16T13:49:19+5:30

पंधरा दिवसाची मुदत, प्राधिकृत अधिकारी फिरकलेच नाहीत.

Due to the absence of audit staff, the Kolhapur District Cooperative Milk Producers Union's inquiry into the purchase of watches and clocks was not held | Kolhapur: ‘लेखापरीक्षण’चे कर्मचारीच नसल्याने ‘गोकुळ’च्या चौकशीला मुहूर्त लागेना

Kolhapur: ‘लेखापरीक्षण’चे कर्मचारीच नसल्याने ‘गोकुळ’च्या चौकशीला मुहूर्त लागेना

राजाराम लोंढे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) जाजम व घड्याळ खरेदीला अद्याप मुहूर्तच लागेना. विभागीय उपनिबंधक (दुग्ध) कार्यालयाने चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, पण तीन आठवडे झाले तरी अद्याप प्राधिकृत अधिकारी ‘गोकुळ‘कडे फिरकलेच नाहीत. लेखापरीक्षण विभागात कर्मचारीच नसल्याने त्यांनी अद्याप चौकशी सुरू केलेली नाही.

‘गोकुळ’ ने प्राथमिक दूध संस्थांना रौप्यमहोत्सवाची भेट देण्यासाठी घड्याळ व जाजमची खरेदी केली होती. सुमारे पावणे चार कोटीची खरेदी खुली निविदा न काढता केवळ कोटेशन काढून केली आहे. याविरोधात उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दुग्ध विभागाकडे तक्रार केली होती.

त्याच्या तक्रारीची दखल घेऊन विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी चौकशीसाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ सहकारी संस्था (पदुम) सांगली सदाशिव गोसावी यांना २५ ऑगस्ट रोजी प्राधिकृत केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.

चौकशीचे आदेश देऊन तीन आठवडे झाले आहेत. मात्र, प्राधिकृत अधिकारी सदाशिव गोसावी यांनी अद्याप चौकशी सुरूही केलेली नाही. प्राधिकृत अधिकारी कर्मचारी नसल्याने फिरकले नाहीत की त्यांना गोकुळकडे फिरकू दिले नाही, असा चर्चा होताना दिसत आहे.

जिल्हा विशेष लेखापरीक्षण (पदुम) विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे येथे कर्मचारी कोणी नसल्याने चौकशी करता आलेली नाही. याबाबत, मी लेखापरीक्षण विभागासह विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांना यापूर्वीच कळवले आहे. कर्मचाऱ्यांची उपलब्धता होताच चौकशीचे काम सुरू करणार आहोत.- सदाशिव गोसावी (प्राधिकृत अधिकारी)
 

‘गोकुळ’च्या आर्थिक वर्षातील कामकाजाची चौकशी करायची नाही. केवळ जाजम व घड्याळ्याची खरेदी नियमानुसार झाली की नाही, एवढेच तपासायचे होते. मात्र, तीन आठवडे झाले तरी अद्याप संबधित अधिकारी ‘गोकुळ’कडे फिरकलेही नाहीत. आता आम्हाला कायदेशीर मार्गाचा आधार घेऊन जिल्ह्यातील दूध उत्पादकांना न्याय मिळवून द्यावा लागेल. - संजय पवार (उपनेते, उद्धवसेना)

Web Title: Due to the absence of audit staff, the Kolhapur District Cooperative Milk Producers Union's inquiry into the purchase of watches and clocks was not held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.