कोल्हापुरातील बी.एड कॉलेजच्या इमारतीवर ‘डाएट’चा ‘डोळा’, कॉलेज बंद पाडण्याचा डाव
By पोपट केशव पवार | Updated: January 30, 2025 11:47 IST2025-01-30T11:45:41+5:302025-01-30T11:47:12+5:30
अर्धी इमारत करवीर तहसीलकडे

कोल्हापुरातील बी.एड कॉलेजच्या इमारतीवर ‘डाएट’चा ‘डोळा’, कॉलेज बंद पाडण्याचा डाव
पोपट पवार
कोल्हापूर : कोल्हापुरातील बीटी कॉलेज परिसरातील महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक विद्यालयाच्या इमारतीमधील आधीच दहा खोल्या करवीर तहसील कार्यालयाने घेतल्याने या विद्यालयाला जागेचा प्रश्न भेडसावत असताना आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेनेही (डाएट) या विद्यालयातील चार खोल्यांवर डोळा ठेवल्याने हे विद्यालय बंद पाडायचे आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. डाएटने यातील चार खोल्या मिळण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
कोल्हापूर शहरातील बीटी कॉलेज परिसरात महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक विद्यालय आहे. या विद्यालयाच्या इमारतीत पूर्वी २४ खोल्या होत्या. मात्र, एक वर्षांपूर्वी करवीर तहसील कार्यालय बीटी कॉलेज परिसरात स्थलांतरित केल्याने तहसील कार्यालयाने यातील दहा खोल्या स्वत:साठी घेतल्या. यामुळे अवघ्या १४ खोल्यांमध्ये शिक्षक, विद्यार्थी व प्रशासनाला शैक्षणिक गाडा हाकावा लागत आहे. खोल्या कमी असल्याने यंदा या विद्यालयाला नॅकचे मानांकनही कमी मिळाले. त्यात आता डाएटनेही याच विद्यालयातील चार खोल्या मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे.
मुली आक्रमक
या कॉलेजमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. मुलींसाठी नवीन इमारतीमधील उपलब्ध चार खोल्यांपैकी दोन खोल्यांमध्ये स्वच्छतागृह व विश्रांतीगृहाची सुविधा आहे. मात्र, डाएट या खोल्या मागत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही अडचण झाली आहे. विद्यालयाच्या खोल्या सगळेच पळवून नेत असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले असून, त्यांनी बुधवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.
..तर मान्यता रद्द होण्याची भीती
या विद्यालयाचे पूर्वी बी प्लस हे मानांकन होते. वर्गखोल्या कमी झाल्याने यंदा मानांकन घसरले आहे. आता डाएटनेही यातील चार वर्गखोल्या घेतल्यास या विद्यालयाची राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडून मान्यता काढून घेतली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
कागलमध्ये चार कोटींची इमारत धूळखात
डाएटचा कारभार हाकण्यासाठी कागलमध्ये चार कोटी रुपयांची इमारत बांधण्यात आली. मात्र, या विभागाचे काम कोल्हापूर शहरातूनच केले जात असल्याने ती इमारत धुळखात पडली आहे. तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही डाएटचे कार्यालय कागलातील नव्या इमारतीत हलवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचेही पालन झालेले नाही.
बीएड कॉलेज दृष्टीक्षेपात
- विद्यार्थी संख्या ८७
- मुले-१७
- मुली -७०
- शिक्षक-शिक्षकेतर : ११
- एकूण खोल्या : १४