उच्च विद्युत दाबामुळे घरातील विद्युत मीटर व उपकरणे जळून खाक, न्हाव्याचीवाडी दोन दिवस अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 17:51 IST2021-12-13T17:50:38+5:302021-12-13T17:51:06+5:30
जनावरांसाठी कापून ठेवलेले गवत जळाल्याने मोठा धूर झाला. यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला व धावत येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

उच्च विद्युत दाबामुळे घरातील विद्युत मीटर व उपकरणे जळून खाक, न्हाव्याचीवाडी दोन दिवस अंधारात
अणूस्कुरा : न्हाव्याचीवाडी (ता. शाहूवाडी) येथे उच्च विद्युत दाबामुळे शॉर्टसर्किट होऊन वाडीतील सर्व विद्युत मीटर व उपकरणे जळून खाक झाल्याने सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
न्हाव्याचीवाडीत वीस ते बावीस कुटुंबे राहतात. रविवारी (दि. 12 डिसेंबर) दुपारच्या वेळी विद्युत डीपीत बिघाड झाल्याने उच्च विद्युत दाब तयार झाला. त्यामुळे या वाडीतील सर्वच घरातील 19 विद्युत मीटर, आठ टीव्ही संच, चार रेफ्रिजरेटर जळून खाक झाले. तसेच जनावरांसाठी कापून ठेवलेले गवत जळाल्याने मोठे नुकसान झाले. गवत जळाल्याचा मोठा धूर दिसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला व धावत येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा बँक संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, सरपंच दीप्ती पाटील, ग्रामसेवक सुभाष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तरी सदर घटनेचा पंचनामा करून सर्व लोकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व नवीन विद्युत मीटर बसवून वीज सुरु करावी अशी मागणी वाडीतील लोकांनी केली आहे.
अन् पुढील धोका टळला
कर्मचारी आनंदा चव्हाण यांना न्हाव्याचीवाडी येथे शॉर्टसर्किटने आग लागल्याचे दूरध्वनीवरून समजताच त्यांनी मांजरे येथे जाऊन मुख्य विद्युत कनेक्शन बंद केले. त्यामुळे पुढील धोका टळला.