शेतकऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेततळी ‘कोरडी’
By Admin | Updated: February 27, 2015 23:19 IST2015-02-27T22:13:19+5:302015-02-27T23:19:39+5:30
दोन वर्षांत ११० तलाव अपूर्णावस्थेत : सुमारे दीड कोटींचे अनुदान खर्चाविना राहणार

शेतकऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेततळी ‘कोरडी’
आयुब मुल्ला ल्ल खोची सामूहिक शेततळ्यांची कामेच जिल्ह्यात थंडावली आहेत. त्यामुळे पूर्वसंमती दिलेल्या ११० तलावांच्या अनुदानाची सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम मार्चअखेर खर्च होण्याची शक्यता कमी आहे. साहजिकच याचा परिणाम अनुदान वितरणावर होणार आहे. दिलेली मंजुरी रद्द करण्यासंदर्भातील सूचनाही संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याची प्रक्रिया शासनाच्या कृषी विभागाकडून सुरू झाली आहे. जिल्ह्यात दोन ते सात हजार घनमीटर क्षमतेचे शेततळे उभारण्याचा ट्रेंड जास्त आहे; परंतु तोच आता शेतकऱ्यांना अवजड वाटू लागला आहे. त्यामुळे तत्काळ कामे होताना दिसत नाहीत. अर्धवट कामे ठेवून त्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात प्रत्यक्ष शेतात जाऊन लाभार्थ्यांना दिलेल्या वेळेत पूर्ण करावे यासाठी मार्गदर्शनाचा झपाटा लावला. तरीसुद्धा वर्षभरात याचे आवश्यक ते निकाल मिळालेले नाहीत. त्यामुळे ‘पेंडींग’ कामांची परंपरा वर्षभरात टिकल्याचे चित्र समोर आले आहे. सन २०१२-१३ मध्ये १४५ प्रस्तावांना मान्यता दिली. त्यापुढे कामाचा उठाव होईल, असे फक्त लाभार्थ्यांच्या बोलण्यातूनच ऐकावयाला मिळाले. त्यादृष्टीने पूर्वसंमती दिलेले अधिकारी खूश झाले. शेततळ्यांचे तीन टप्प्यांत काम होते. मातीकाम, प्लास्टिक आच्छादन, कुंपन अशा तीन टप्प्यांत याचे अनुदान दिले जाते; परंतु पहिला टप्पा पूर्ण, दुसरा अपूर्ण, तिसऱ्याचा पत्ताच नाही, अशीच अवस्था बहुतांश तलावांची असल्याचे चित्र समोर आले आहे. फक्त ३६ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचे सुमारे ७२ लाखांचे अनुदानही लाभार्थ्यांना दिले आहे. परंतु, ‘पेंडींग’ कामामुळे कृषी विभागाची चांगलीच गोची झाली आहे. दोन वर्षांपूर्वीचीच कामे झाली नसल्याने चालू वर्षी नव्याने शेततळ्यांचे प्रस्तावच स्वीकारले गेले नाहीत. पूर्वी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांनी शेततळी पूर्ण न केल्यामुळे नव्याने इच्छुक असलेले या योजनेपासून दूर राहिले आहेत. याची गंभीर दखल घेत जिल्ह्याच्या कृषी विभागाने पूर्वसंमती रद्द करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांमार्फत दिला आहे. १० मार्चपर्यंत याची मुदतही दिली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत कितपत अन् काय उठाव होणार हे तुलना करता लक्षात येते. त्यामुळे जवळपास जुन्या प्रस्तावांचे अनुदान वितरणाअभावी राहणार हे स्पष्ट आहे. नवे प्रस्ताव मात्र एप्रिलमध्ये स्वीकारावे लागणार आहेत. सामूहिक शेततळी सामूहिक शेततळी हा उपक्रम राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राबविला जातो. पन्नास टक्के अनुदान त्यासाठी दिले जाते. कमीत कमी ६५ हजारांपासून साडेपाच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या तलावांचे पाणी फळबाग, फुलशेती यासाठी दिले जावे हा हेतू आहे. ५०० ते दहा हजार घनमीटर क्षमतेचे शेततळे या योजनेत असते. गतवर्षी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत दहा कोटी रुपये प्राप्त झाले होते. पुढच्या म्हणजे सन २०१५-१६ साठी तेरा कोटींचा आराखडा तयार केला आहे. सामूहिक शेततळ्यांच्या पूर्ततेसाठी १० मार्च ही अंतिम मुदत दिली आहे. - सुधर्म जामसांडेकर, कृषी उपसंचालक, कोल्हापूर. शेततळ्यांची पेंडींग यादी तालुकानिहाय अशी : आजरा३८ भुदरगड४ गडहिंग्लज९ चंदगड१० शाहूवाडी५ पन्हाळा१० हातकणंगले२१ शिरोळ४ गगनबावडा१ कागल१ करवीर२ राधानगरी४ एकूण १०९