विळखा अमली पदार्थांचा: दिल्लीतील घातक इंजेक्शन्सची पोळेमुळे खेड्यापाड्यांत 

By उद्धव गोडसे | Updated: July 22, 2025 19:11 IST2025-07-22T19:11:15+5:302025-07-22T19:11:33+5:30

शरीराची दुर्दशा : कायद्यातील पळवाटांमुळे विक्रेत्यांचे फावले

Drug trafficking and sales increased due to loopholes in the law | विळखा अमली पदार्थांचा: दिल्लीतील घातक इंजेक्शन्सची पोळेमुळे खेड्यापाड्यांत 

संग्रहित छाया

उद्धव गोडसे

कोल्हापूर : गांजा, अफू, चरस, एमडी ड्रग्जसह शरीराला अधिक घातक असलेल्या मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनद्वारे नशा केली जात आहे. दिल्लीतून ऑनलाइन पद्धतीने मागवलेल्या इंजेक्शनचा पुरवठा खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचला आहे. ही नशा शरीर पोखरून टाकणारी असल्याने घातक ठरत आहे. कायद्यातील पळवाटांमुळे तस्कर आणि विक्रेत्यांचे फावल्याने याचा धोका अधिकच वाढला आहे.

अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणारे विक्रेते सतत नवनवीन पदार्थांच्या शोधात असतात. वैद्यकीय क्षेत्रात उपचारासाठी वापरली जाणारी काही औषधे आता नशेसाठी वापरली जात आहेत. वास्तविक अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकण्यास निर्बंध आहेत. तरीही काही तस्कर आणि औषध वितरक संगनमताने याची छुपी विक्री करून लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. औषधांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीने याला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.

तस्करांकडून मेफेनटरमाईन सल्फेट या गुंगीकारक औषधांची नशेसाठी विक्री केली जात आहे. चार-पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात याचा वापर अत्यल्प होता. अलीकडे नशेखोरांकडून याच्या मागणीत कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळेच पोलिसांच्या कारवाया वाढल्या आहेत. खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सदस्य अजय श्रीकांत डुबल (वय ४४) याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून गुंगीकारक औषधे जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह करवीर आणि इचलकरंजी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत मोठा साठा जप्त केला आहे. 

धोका काय?

मेफेनटरमाईन सल्फेटचे इंजेक्शन सातत्याने घेतल्यास याचा शरीरातील रक्तदाब, हृदय, मूत्रपिंड यावर परिणाम होतो. मानसिक अस्वस्थता वाढते. मेंदूचे शरीरावरील नियंत्रण सुटून इतर आजार उद्भवू शकतात. काही अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवण्याचा धोका असतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

शिक्षा होण्याचे प्रमाण कमी

गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ नुसार पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जातात. या कायद्यानुसार दोषींना सात ते १० वर्षांचा कारावास होऊ शकतो. पोलिसांकडून होत असलेल्या कारवायांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र, तस्कर आणि विक्रेत्यांवर आरोपपत्र दाखल करणे, न्यायालयात त्याच्या विरोधातील ठोस पुरावे सादर करणे आणि त्याला शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे काम होत नाही. त्यामुळे पुन्हा-पुन्हा तेच आरोपी तस्करीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे दिसतात.

जिल्ह्यात अफूचाही वापर

राजस्थानातून आणलेल्या अफूची पुणे-बंगळुरू महामार्गावर विक्री केली जाते. बहुतांश ट्रकचालक अफूची खरेदी करतात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गेल्या वर्षभरात दोन कारवाया करून अफू तस्करीचे राजस्थान कनेक्शन उघडकीस आणले होते.

विक्रीची साखळी तोडणे गरजेचे

सर्वच अमली पदार्थांच्या विक्रीतून मोठा नफा मिळत असल्याने विक्री करणारे रॅकेट वाढले आहेत. यांची साखळी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत कार्यरत आहे. ही साखळी तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाया होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

तस्कर आणि विक्रेत्यांना पकडण्याचे काम पोलिसांकडून सुरूच आहे. या मार्गाकडे जाणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी पालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. मुलांच्या वर्तनाकडे लक्ष ठेवून त्यांना वेळीच समज द्यावी. खरेदीदार नसतील तर याची विक्री थांबेल. - योगेश कुमार, पोलिस अधीक्षक

Web Title: Drug trafficking and sales increased due to loopholes in the law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.