औषध फवारणी, कोविड केंद्रे सुरू करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST2021-04-06T04:23:45+5:302021-04-06T04:23:45+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती प्रशासक बलकवडे यांना ...

औषध फवारणी, कोविड केंद्रे सुरू करावीत
कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्याची विनंती प्रशासक बलकवडे यांना केली होती. त्यानुसार ही बैठक पार पडली. बैठकीस माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राहुल चव्हाण, सुनील पाटील, अर्जुन माने, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त संदीप घार्गे उपस्थित होते.
शहरात सर्वत्र तातडीने औषध फवारणी घेण्यात यावी, तीन कोविड केंद्र सुरू करण्यात यावीत, रुग्णालयात तसेच कोविड केंद्रात काम करण्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स, नर्स यांची नेमणूक करावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. बाहेरगावांहून शहरात येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून त्यांच्या कोरोना तपासणी सक्तीची करावी, असेही यावेळी सुचविण्यात आले.
या आधी कोरोनाशी लढण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, औषधांचा साठा जिल्हा परिषदेकडून मिळत होता. आता जिल्हा परिषदेने खरेदी बंद केली आहे. त्यामुळे महापालिकेने स्वत:च्या निधीतून आवश्यक साहित्याची, औषधांची तातडीने खरेदी करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
पॉईंटर - बैठकीतील सूचना-
- स्मशानभूमीत १० लाेकांना परवानगी द्या
- लग्न समारंभातील संख्या मर्यादित ठेवा
- रक्षाविसर्जन दुसऱ्या दिवशी करावे
- महात्मा फुले आरोग्य योजनेतील रुग्णालयाची नावे प्रसिद्ध करावीत
- शहरात कोणत्या रुग्णालयात किती बेड याची माहिती द्यावी.
-ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार-
महानगरपालिका प्रशासनाने आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयसोलेशन रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी ८० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झाला आहे. प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून रोज १५० सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून त्याचा लाभ रुग्णालयातील गरजू रुग्णांना होईल.
(फोटो देत आहे.)