ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक होणार तयार : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 17:05 IST2020-11-02T17:02:42+5:302020-11-02T17:05:27+5:30
Collcator, hasanmusrif, kolhapurenews, droan ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक तयार होणार आहे. अचूक मालमत्तापत्रक तयार झाल्याने याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

ड्रोनद्वारे गावठाण मोजणीमुळे मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक होणार तयार : मुश्रीफ
कोल्हापूर : ड्रोनद्वारे गावठाण मोजणी झाल्यानंतर गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्तेचे अचूक मालकीपत्रक तयार होणार आहे. अचूक मालमत्तापत्रक तयार झाल्याने याचा लाभ गावकरी व ग्रामपंचायत यांच्यासाठी लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल तालुक्यातील बामणी येथे ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजनेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते ड्रोन उडवून करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, कागल पंचायत समितीच्या सभापती पुनम मगदूम, जिल्हा परिषद सदस्य अंबरिष घाटगे, उपविभागीय अधिकारी रामहरी भोसले, तहसिलदार शिल्पा ठोकडे, भूमि अभिलेख विभागाचे अधीक्षक वसंत निकम, बामणीचे सरपंच रावसाहेब पाटील यांच्यासह बामणी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे त्यांच्या जमिनीचा 7/12 उतारा उपलब्ध होतो त्याच प्रमाणे गावठाणाचे सीमांकन झाल्यानंतर प्रत्येक नागरीकास त्याच्या हक्काच्या मालमत्तेचे मालकीपत्रक उपलब्ध होणार आहे. अचुक मालमत्ता मालकीपत्रकामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे व्यवहार करण्यास कोणतीही समस्या येणार नाही. खरेदी-विक्री, बँक कर्ज, मिळकत हस्तांतर या बाबी सुलभतेने पार पाडण्यास मदत होईल, असेही ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमी मनुष्यबळाचा वापर करुन मोजणी होणार असून ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीमध्ये पारदर्शकता व अचुकता असणार आहे. ड्रोनद्वारे गावठाणांचे सीमांकन केल्यामुळे गावठाणातील प्रत्येक घराचा, खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा तयार होईल. गावातील मालमत्तांचे सीमांकन करण्यासाठी ग्रामपंचायतीस येणारा खर्च पंधाराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या अबंधीत अनुदानातून (अनटाईड) करण्यास परवानगी दिली जाईल. गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी ग्रामपंचायतीना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, या योजनेतून गावकऱ्यांना त्यांच्या मालमत्तेच्या मालकीपत्रक देण्याचे काम होणार असून गावकऱ्यांबरोबरच ग्रामपंचायतीसही याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यात महाराजस्व अभियान राबविले जात असून या अभियानातून जनतेची प्रलंबित कामे मार्गी लावली जात असल्याचे ते म्हणाले.
ड्रोनद्वारे गावठाण मोजणी योजना ग्रामविकास विभाग, महसूल विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मालमत्ता पत्रकामुळे आर्थिक व्यवहाराला चालना मिळणार आहे. मिळकत हस्तांतरण, बँक कर्ज या बाबी सुलभतेने पार पाडण्यास मदत होईल असे भूमि अभिलेख अधिक्षक निकम यांनी प्रास्ताविकात सांगितले. पंचायत समिती सभापती पुनम मगदूम व जिल्हा परिषद सदस्य अंबरिष घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
गावठाण भूमापन योजनेमुळे नागरिकांना होणारे फायदे
- प्रत्येक धारकाचे जागेचा/मिळकतीचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील व मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.
- प्रत्येक धारकाला आपले मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका व सनद मिळेल
- गावठाणातील जागेची मिळकत पत्रिकेस शेतीचे 7/12 प्रमाणेच धारकाचे मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता आहे.
- मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होई शकते, तारण करता येईल, जामिनदार म्हणून राहता येईल आणि विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.
- बांधकाम परवानगीसाठी मिळकत पत्रिका आवश्यक आहे.
- सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपले मिळकतीचे संरक्षण करता येईल.
- गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद संपुष्ठात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.
- मिळकती संबंधी बाजारपेठेत तरलता येऊन आर्थिक पत उंचावेल.